
नवीन AI आधारित फीचर्सचा वापर करून गुगलने आयफोन युजर्ससाठी एक क्रांतिकारी अनुभव आणला आहे. गुगलने ‘लेंस स्क्रीन-सर्चिंग’ हे नवीन फीचर सादर केलं असून, आता iPhone वापरकर्तेही स्क्रीनवर जे काही दिसतं त्याविषयी सहज शोध घेऊ शकतात. हे फिचर आधी अँड्रॉइड युजर्सना मिळालेल्या ‘Circle to Search’ प्रमाणेच आहे, पण आता iOS युजर्ससाठी सुद्धा हे सुविधा उपलब्ध झाली आहे.
गुगल लेंस स्क्रीन-सर्चिंगमुळे वापरकर्त्यांना वेगळ्या ॲपमध्ये जाऊन शोध घेण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, तुम्ही गुगल क्रोममध्ये एखादा लेख वाचत असताना त्यात एखादं पेंटिंग, वस्तू, कपड्यांचा ब्रँड किंवा ठिकाण दिसलं, आणि त्याबद्दल अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही स्क्रीनवर फक्त त्या वस्तूभोवती गोल काढा किंवा त्यावर टॅप करा. लगेच गुगल त्या संदर्भातील सर्च रिझल्ट्स दाखवेल. या सुविधेमुळे माहिती मिळवणं अधिक सोपं आणि वेगवान झालं आहे.
हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला गुगल क्रोम किंवा गुगल सर्च ॲप वापरावं लागेल. या ॲपमध्ये वरच्या बाजूला तीन डॉट्स दिसतात, त्यावर क्लिक करा आणि ‘Search screen with Google Lens’ हा पर्याय निवडा. लवकरच गुगल लेंसचं आयकॉन थेट स्क्रीनवर दिसू लागेल, त्यामुळे अधिक सुलभपणे हे फीचर वापरता येईल.
हे फीचर या आठवड्यात जगभरातील iPhone युजर्ससाठी रोलआउट केलं गेलं आहे. यासोबतच गुगलचं ‘AI Overview’ नावाचं आणखी एक फीचरही विकसित केलं जात आहे. AI Overview सर्च रिझल्ट्समध्ये थेट संक्षिप्त माहिती देते. समजा तुम्ही एखाद्या कारचा फोटो काढलात, तर त्याबाबत लगेच वैशिष्ट्ये, ब्रँड, किंमत, आणि इतर महत्त्वाची माहिती दिसते, शिवाय उपयुक्त लिंक्सही मिळतात.
गुगलने सादर केलेली ही सुविधा iPhone युजर्सना एका नवीन डिजिटल युगात घेऊन जाते. AI आणि Vision आधारित शोधामुळे मोबाईल सर्फिंगचा अनुभव अधिक इंटेलिजंट, जलद आणि सहज होणार आहे. तुम्ही अजूनही हे फिचर वापरले नसेल, तर गुगल ॲप अपडेट करून आजच वापरून बघा आणि माहितीच्या दुनियेत एक नवा अनुभव घ्या!