5G नेटवर्क भारतात पसरण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 6G मिशन लाँच, जाणून घ्या सर्वकाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीच्या विज्ञान भवनातील एका कार्यक्रमात आयटीयुच्या विभागीय कार्यालय आणि इनोव्हेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या माध्यमातून 6 जी नेटवर्कचा रोडमॅप तयार करण्यात येणार आहे.

5G नेटवर्क भारतात पसरण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 6G मिशन लाँच, जाणून घ्या सर्वकाही
5G नेटवर्क मोबाईलमध्ये येत नाही तोच 6G ची तयारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विजन डॉक्यूमेंट सादर
| Updated on: Mar 22, 2023 | 3:07 PM

मुंबई : तंत्रज्ञानाच्या युगात अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही झटपट होत आहेत. कालपर्यंत ज्या गोष्टी कठीण वाटत होत्या, त्या आता एका क्लिकवर होत आहेत. पण असं असलं तरी मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट स्पीडही तितकाच महत्त्वाचा आहे. भारतात 4 जी नंतर आता 5 जीचं जाळं विणलं जात आहे. मात्र तत्पूर्वीच भारतात 6जी नेटवर्कची तयारी सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी भारतात 6 जी विजन डॉक्युमेंट सादर करण्यात आलं. त्याचबरोबर 6जी रिसर्च आणि डेव्हलपमेंट टेस्ट बेडही लाँच केलं आहे.

6जी विजन डॉक्युमेंट सादर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, “तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे भारताचं दशक आहे. भारताचं टेलिकॉम आणि डिजिटल मॉडेल सुरक्षित आणि पारदर्शक आहे.” भारताचं 6 जी विजन डॉक्युमेंट 6जी (टीआयजी-6जी) टेक्नोलॉजी इनोव्हेशन ग्रुपने तयार केला आहे. या ग्रुपची स्थापना नोव्हेंबर 2021 मध्ये करण्यात आली होती.

“भारतात प्रत्येक महिन्याला 800 कोटी रुपयांची देवाणघेवाण युपीआयच्या माध्यमातून होते. प्रत्येक दिवशी 7 कोटी ई- अथॉन्टिकेशन होत आहे. 28 लाख कोटी रुपये थेट बेनफिट ट्रान्सफरच्या मदतीने नागरिकांच्या खात्यात पाठवले जात आहेत. 5 जी सेवा सुरु केल्यानंतर 6 जी सेवेची आपण चर्चा करत आहोत. हे भारताचं भविष्य सांगत आहे.”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

टेक्नोलॉजी इनोव्हेशन ग्रुपमध्ये मंत्रालय आणि विभाग, रिसर्च आणि डेव्हलपमेंट इंस्टिट्युशन, अॅकाडमीक, टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि इंडस्टीचे लोक सहभागी आहेत. या ग्रपुच्या माध्यमातून भारतात 6जी रोडमॅप तयार केला जाणार आहे.

या माध्यमातून इंडस्ट्री, अॅकाडमीक इंस्टिट्युट आणि इतर प्लॅटफॉर्मवर विकसित केलं जाणारं तंत्रज्ञान टेस्ट केलं जाईल. 6 जी डॉक्युमेंट आणि 6 जी टेस्ट बेड देशातील इनोव्हेशन इनेबल, कॅपासिटी बिल्ड आणि नवी टेक्नोलॉजी आपलंस करण्यात मदत करेल.

भारतात 5 जी सर्व्हिस 1 ऑक्टोबर 2022 रोजी लाँच करण्यात आली होती. भारतात 125 शहरात 5 जी सेवा सुरु आहे. एअरटेल आणि जिओ दोघंही आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड 5जी सेवा प्रदान करत आहेत. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनला 5 स्पेक्ट्रम लिलावत 1.50 लाख कोटींची बोली मिळाली होती.

दुसरीकडे, 6 जी प्रत्यक्षात येण्यास काही वर्षांचा कालावधी लागेल. 6 जी नेटवर्क 2028 किंवा 2029 नंतर सुरु होण्याची शक्यता आहे. जगभरात या नेटवर्कसाठी काम सुरु आहे. मात्र याची तयारी आतापासून सुरु झाली आहे.