लॅपटॉपवर काय करता, यावरही कंपनीची नजर? कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण, टीसीएसच्या मॉनिटरिंग टूलने..
टीसीएसने कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवर एक खास मॉनिटरिंग टूल बसवण्यास सुरुवात केली आहे. या टूलच्या मदतीने कर्मचारी कोणते ॲप्लिकेशन वापरतात आणि त्यावर किती वेळ घालवतात, याची माहिती कंपनीला मिळू शकते.या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवण्याबरोबरच त्यांच्या गोपनीयतेचा आणि डेटा सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारचे मॉनिटरिंग करणारी टीसीएस ही काही एकटीच कंपनी नाही. मेटालाही अलीकडे या मुद्द्यावरून मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

मनी कंट्रोलच्या अहवालानुसार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपल्या कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवर एक खास सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यास सुरुवात केली आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने कंपनीला कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवरील कामकाजावर अधिक बारकाईने लक्ष ठेवता येऊ शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे सॉफ्टवेअर नेमकं काय पाहणार? ‘डिजिटल युझर एक्सपीरियन्स मॉनिटरिंग टूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सॉफ्टवेअरमुळे कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवर कोणते ॲप्लिकेशन वापरले जात आहे आणि त्या ॲप्लिकेशनवर कर्मचारी किती वेळ घालवत आहेत, याची माहिती मिळू शकते, अशी माहिती समोर आली आहे. म्हणजेच कर्मचारी लॅपटॉपवर दिवसभरात कोणत्या ॲपचा वापर करतात आणि त्यावर किती वेळ देतात, याचा अंदाज कंपनीला घेता येऊ शकतो. टीसीएसच्या दृष्टीने कंपनीचा डेटा सुरक्षित ठेवणे आणि कामकाज अधिक प्रभावीपणे पाहणे हा यामागचा उद्देश असू शकतो. मात्र, याचवेळी कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवण्याची आणि त्यांच्या प्रायव्हसीची सीमा नेमकी कुठे असावी? असा ही एक प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे टीसीएसचे हे नवे मॉनिटरिंग टूल सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
मात्र, या सॉफ्टवेअरमधून नेमकी किती माहिती गोळा केली जाते आणि त्याचा वापर कशासाठी होतो, हे अद्याप स्पष्ट नाही. कंपन्या असे टूल्स लॅपटॉपवरील संशयास्पद हालचाली ओळखण्यासाठी, सुरक्षा धोके टाळण्यासाठी आणि गोपनीय माहिती बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी वापरू शकतात. पण दुसरीकडे, कर्मचारी कोणते ॲप वापरतात, किती वेळ वापरतात याची माहिती कंपनीकडे गेल्यास प्रायव्हसीचा मुद्दा निर्माण होतो. त्यामुळे सुरक्षेच्या नावाखाली कर्मचाऱ्यांवर किती लक्ष ठेवावे, हा प्रश्न उपस्थित होतो.
दरम्यान, टीसीएसने या मॉनिटरिंग टूलबाबत अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. हे सॉफ्टवेअर कोणत्या कंपनीचे आहे, कोणती माहिती गोळा केली जाते आणि हा डेटा कोण पाहतो, याबाबतही स्पष्टता नाही. त्यामुळे या टूलचा नेमका उद्देश काय आणि किती डेटा ट्रॅक केला जाणार आहे, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
कर्मचारी मॉनिटरिंग काही नवीन नाही!
कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर विशेषतः आयटी आणि बीपीएम क्षेत्रात आधीपासूनच होत आहे. मात्र, ही मॉनिटरिंग किती पुढे जाऊ शकते यावर आता चर्चा सुरू आहे. याचे ताजे उदाहरण मेटा आहे. एआय डेटा गोळा करण्यासाठी कंपनीने असे टूल आणले होते ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कीबोर्ड टायपिंग आणि माऊस हालचालींची नोंद ठेवली जात होती. पण यावर सुद्धा मोठी टीका झाली.
टीकेनंतर मेटाने बदल करत कर्मचाऱ्यांना 30 मिनिटांपर्यंत डेटा गोळा थांबवण्याची आणि काही प्रकरणांमध्ये सूट मागण्याची सुविधा दिली. तसेच संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा उपाय असल्याचे कंपनीने सांगितले. म्हणजेच, कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणे नवीन नाही, पण लॅपटॉपपासून कीबोर्ड आणि माऊसच्या प्रत्येक हालचालीपर्यंत जाणारी मॉनिटरिंग किती योग्य? हा प्रश्न जगभर चर्चेत आहे.