
आजकाल बहुतांश लोक आपल्या स्मार्टफोनसाठी टेम्पर्ड ग्लासचा वापर करतात, कारण तो स्क्रीनला स्क्रॅच आणि तुटण्यापासून वाचवतो. मात्र अनेकदा आपण चुकीचा टेम्पर्ड ग्लास निवडतो आणि त्याचा फटका आपल्या फोनच्या स्क्रीनला बसतो. अशा चुका टाळण्यासाठी योग्य टेम्पर्ड ग्लास कसा निवडावा हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बाजारात अनेक प्रकारचे ग्लास उपलब्ध आहेत पण तुमच्यासाठी योग्य कोणता, हे समजून घेणं गरजेचं आहे.
मार्केटमध्ये कोणते प्रकार उपलब्ध आहेत?
बाजारात 2D, 2.5D, 3D, 5D आणि 11D अशा प्रकारचे टेम्पर्ड ग्लास मिळतात. 2D ग्लास स्क्रीनच्या फक्त समोरील भागाचे संरक्षण करतो, मात्र कोपऱ्यांचं रक्षण करत नाही. 2.5D ग्लास थोडेफार बाजूचे भाग कव्हर करतो, जे सामान्य संरक्षणासाठी योग्य आहे. पण जर तुमचा फोन curved डिस्प्ले असलेला असेल, तर 5D किंवा 11D ग्लास सर्वोत्तम पर्याय ठरतो, कारण हे ग्लास पूर्णपणे कोपरे कव्हर करतात आणि अधिक मजबुती देतात.
टेम्पर्ड ग्लास निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा
क्वालिटी
टेम्पर्ड ग्लास खरेदी करताना केवळ ब्रँड किंवा किंमत बघून निर्णय न घेता त्याची क्वालिटी आणि टिकाऊपणा नक्की तपासा. जाडसर ग्लास स्क्रीनला जास्त संरक्षण देतो आणि तुमचा मोबाईल सुरक्षित ठेवतो. स्क्रीन सुंदर दिसणं महत्त्वाचं असलं, तरी सुरक्षित राहणं हे त्याहून जास्त गरजेचं आहे!
कोटिंग
हायड्रोफोबिक आणि ओलियोफोबिक कोटिंग असलेला टेम्पर्ड ग्लास निवडा. या कोटिंगमुळे स्क्रीनवर बोटांचे ठसे राहत नाहीत आणि टच एक्सपीरियन्सही स्मूथ राहतो. दुकानदार बहुतेक वेळा हे सांगत नाहीत, पण यामुळेच स्क्रीन सतत स्वच्छ आणि स्पष्ट राहते.
प्रायव्हसी टेम्पर्ड ग्लासचे फायदे आणि तोटे
प्रायव्हसी टेम्पर्ड ग्लास वापरण्याचे अनेक फायदे असून काही तोटेही आहेत. सध्या अनेक जण आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी असा ग्लास वापरण्याकडे वळत आहेत. या टेम्पर्ड ग्लासचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे तुमचा फोन समोरून वापरणाऱ्याला स्क्रीन पूर्णपणे स्पष्ट दिसतो, पण बाजूच्या कोणालाही स्क्रीनवरील मजकूर दिसत नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये काम करताना गोपनीयता अबाधित राहते. त्याचबरोबर, या ग्लासमध्ये स्क्रीन स्क्रॅचपासून आणि फुटण्यापासूनही सुरक्षित राहते, त्यामुळे हा एक सुरक्षित पर्याय ठरतो. शिवाय, याचा लूकही प्रीमियम असल्याने फोन अधिक प्रोफेशनल वाटतो.
मात्र, प्रायव्हसी टेम्पर्ड ग्लासचे काही तोटेही आहेत. यामधील खास लेयरमुळे स्क्रीन अंधुक दिसू लागते, त्यामुळे तुम्हाला स्क्रीन स्पष्ट पाहण्यासाठी फोनची ब्राइटनेस जास्त ठेवावी लागते. परिणामी, बॅटरीचा खर्चही वाढतो. गेमिंग, फोटो एडिटिंग किंवा व्हिडिओ बघताना स्क्रीनची चमक कमी वाटते, त्यामुळे काही वापरकर्त्यांचा अनुभव थोडा खराब होतो. शिवाय, काही स्वस्त दर्जाच्या प्रायव्हसी ग्लासमुळे टच सेन्सिटिव्हिटीही कमी होऊ शकते. या टेम्पर्ड ग्लासची किंमत सामान्य ग्लासपेक्षा थोडी जास्त असते, त्यामुळे अनेक वेळा लोक परवडणाऱ्या पर्यायांचा विचार करतात.
कोणता टेम्पर्ड ग्लास तुमच्यासाठी बेस्ट?
जर तुम्ही फोन फार रफ वापरत नसाल, तर 2.5D किंवा 5D ग्लास पुरेसा ठरतो. पण जर तुम्ही रफ युजर असाल किंवा फोन बराच वेळ हातात घेत असाल, तर 11D किंवा गोरिल्ला ग्लास लेयरिंग असलेला टेम्पर्ड ग्लास वापरणं अधिक सुरक्षित ठरेल. स्क्रीनची टिकाऊपणा, टच रेस्पॉन्स आणि संरक्षण या सगळ्या गोष्टींचा विचार करून टेम्पर्ड ग्लास निवडा.