
Baba Vanga : सध्याच्या जागतिक परिस्थितीकडे बघायचं झालं तर 2026 या वर्षाची सुरुवातच अस्थिरता, संघर्ष आणि तणावाने झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. एकीकडे इराणमध्ये हजारो नागरिक आपल्या सरकारविरोधात रस्त्यावर उतरले असताना दुसरीकडे लॅटिन अमेरिकेत वेनेजुएलाच्या मुद्द्यावरून अमेरिका आक्रमक भूमिकेत दिसून येत आहे. या सर्व घडामोडींमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तिसऱ्या महायुद्धाची शक्यता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
बाबा वेंगांच्या भविष्यवाण्यांची आठवण
बुल्गारियातील प्रसिद्ध भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांनी यापूर्वी 9/11 हल्ला आणि कोविड-19 महामारीसारख्या घटनांबाबत केलेल्या भाकितांमुळे जगाचे लक्ष वेधले होते. अशातच आता बाबा वेंगांनी 2026 हे वर्ष युद्ध आणि विनाशाचे असेल तसेच तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात याच काळात होईल अशी भविष्यवाणी केली होती. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता त्यांच्या या भाकितांची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अलीकडेच अमेरिकेने उत्तर अटलांटिक महासागरात रशियन ध्वज असलेला M/V BELA 1 हा तेल टँकर जप्त केल्याची घोषणा केली. अमेरिकन तटरक्षक दलाने अनेक आठवडे पाठलाग केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
ANI च्या वृत्तानुसार, या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट्स व्हायरल होत असून ही कारवाई जागतिक संघर्षाच्या सुरुवातीचा इशारा असल्याचं म्हटलं जात आहे. काही नेटकऱ्यांनी तर थेट असेही म्हटले आहे की, ‘डोनाल्ड ट्रंप यांच्या डोक्यावर तिसऱ्या महायुद्धाचे भूत स्वार झाले आहे.’
वेनेजुएलात गुप्त लष्करी कारवाईचा दावा
3 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एक खळबळजनक घोषणा केली. त्यांनी सांगितले की, अमेरिकन लष्कराने वेनेजुएलामध्ये गुप्त सैन्य मोहिम राबवली. ज्यामध्ये वेनेजुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ट्रंप यांनी यावेळी हे देखील स्पष्ट केले की, राजकीय बदल होईपर्यंत वेनेजुएलाचा कारभार अमेरिकेच्या नियंत्रणाखाली राहील. तसेच, वेनेजुएलातील सरकार अमेरिकेला 50 मिलियन बॅरल तेल देणार असल्याचा दावाही त्यांनी केला. याशिवाय, 30 ते 50 मिलियन बॅरल तेल अमेरिका घेईल असेही ट्रंप यांनी सांगितले.
जगभर चिंता, भविष्यात काय?
इराणमधील अंतर्गत असंतोष, वेनेजुएलातील अमेरिकेची लष्करी हालचाल, रशियासोबतचा वाढता तणाव आणि ग्रीनलँडसारख्या मुद्द्यांमुळे जागतिक स्थरावरील राजकारण धोकादायक वळणावर पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर बाबा वेंगांच्या 2026 संदर्भातील भविष्यवाण्या अनेकांना भयभीत करत आहेत.