
Viral Video : भोजपुरी संगीत क्षेत्रातील एका डान्स शोमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या व्हिडिओमध्ये भोजपुरी गायक धनंजय शर्मा एका लाइव्ह कार्यक्रमादरम्यान महिला डान्सरशी गैरवर्तन करताना दिसत असल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेमुळे कलाकारांच्या मंचावरील वागणुकीनंतर आणि महिला कलाकारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्टेजवर गाणे सुरू असताना अचानक धनंजय शर्मा यांनी आपल्या सोबत नृत्य करणाऱ्या महिला डान्सरला जबरदस्तीने उचलल्याचे दिसते. त्यानंतर त्यांनी त्या डान्सरला स्टेजखाली उभ्या असलेल्या प्रेक्षकांच्या गर्दीकडे फेकल्याचा आरोप केला जात आहे. हा प्रकार पाहून तेथे उपस्थित प्रेक्षकही काही क्षण स्तब्ध झाले. कार्यक्रमस्थळी उभ्या असलेल्या एका महिलेने हा प्रकार अत्यंत अपमानास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली.
कारवाईची मागणी
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या प्रकाराला केवळ विनोद म्हणून न पाहता गंभीर गुन्हा मानण्याची मागणी केली आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की गर्दीत फेकल्यामुळे त्या महिला डान्सरला गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. सोशल मीडिया युजर्सनी प्रतिक्रिया देताना कलाकार असणे म्हणजे कोणत्याही महिलेच्या सन्मानाशी खेळ करण्याचा अधिकार नसल्याचेही म्हटले आहे.
या प्रकरणात अनेकांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासनाला टॅग करत गायकाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. संबंधित व्यक्तीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणीही काही सोशल मीडिया युजर्सनी केली आहे.
भोजपुरी गायक धनंजय शर्मा द्वारा मंच से एक नर्तकी को उठाकर जनता के बीच फेंकने की घटना बेहद निंदनीय और शर्मनाक है। ऐसी मानसिकता वाले लोगों के कारण महिलाएं सुरक्षित नहीं है।
क्या बिहार पुलिस ऐसे गायकों को गिरफ्तार करेगी? pic.twitter.com/MaH2ODGFOC
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) March 15, 2026
दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कधी आणि कुठे शूट करण्यात आला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार मुजफ्फरपूर किंवा त्याच्या आसपासच्या ग्रामीण भागात आयोजित करण्यात आलेल्या एका स्टेज शोदरम्यान घडल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बिहार पोलीस देखील सतर्क झाले असून या व्हिडिओची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित पोलीस ठाण्याला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमाचे आयोजक कोण होते याचाही शोध घेतला जात आहे जेणेकरून संपूर्ण घटनेचे सत्य समोर येऊ शकेल.