
आपण इंद्रधनुष्य, उल्कापातापासून निर्माण झालेले सरोवर, समुद्रात आढळणारे निरनिराळे मासे या अशा एक ना अनेक गोष्टी पाहिल्या की निसर्गाची किमया अद्भुत आहे, याचा आपण विचार करायला लागतो. अशाच प्रकारे एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार आज आपण पाहणार आहोत. तुम्ही कधी कल्पना केली आहे का की पाणी आगीसारखं लाल-नारंगी रंगात चमकू शकतो. नाही ना…पण हे खरं आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील योसेमाइट नॅशनल पार्कमध्ये (Yosemite National Park) असाच एक अनोखा नजारा पाहायला मिळतो. याला जगातील सर्वात अनोखा धबाधबा असे म्हटले जाते.
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील योसेमाइट नॅशनल पार्कमध्ये हॉर्सटेल फॉल (Horsetail Fall) नावाचा एक धबधबा आहे. हा धबधबा चक्क आगीच्या प्रवाहासारखा लाल-नारंगी रंगात चमकतो. हे दृश्य इतकं सुंदर आणि मन मोहून टाकणारं असते. यामागे एक विशिष्ट गूढही दडलेलं आहे. नुकतंच इन्स्टाग्रामवर miracle of nature या पेजवरुन या धबधब्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला कॅलिफॉर्नियातील योसेमाइट नॅशनल पार्क असे म्हटले आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हा धबधबा अशा पद्धतीने कसा काय कोसळू शकतो? पण यामागेही एक गुपित दडलेलं आहे. हा खऱ्याखुऱ्या आगीचा धबधबा नाही, तर निसर्गाचा एक अद्भुत नैसर्गिक ऑप्टिकल भ्रम (Optical Illusion) आहे, ज्याला विज्ञान आणि प्रकाश यांचा सुंदर संगम म्हणता येईल. Sfgate.com च्या अहवालानुसार, जेव्हा मावळत्या सूर्याची कोवळी, सोनेरी किरणं हॉर्सटेल फॉलच्या खाली कोसळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर अगदी योग्य कोनात पडतात, तेव्हा त्या विशिष्ट कोनामुळे पाण्यावर एक तीव्र लाल-नारंगी रंगाची चमक निर्माण होते, ज्यामुळे हा धबधबा आगीप्रमाणे वाहत असल्यासारखे भासतो.
हे अविश्वसनीय आणि डोळ्यांना भुरळ घालणारं दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक योसेमाइट नॅशनल पार्कमध्ये गर्दी करतात. हे दृश्य पाहताना अनेकांना प्रश्न पडतो की ‘योसेमाइट फायरफॉल’ खरंच आगीचा बनलेला आहे की काय? पण ते तसं नाही. जर तुम्हालाही या अविस्मरणीय धबधब्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर फेब्रुवारी महिना सर्वोत्तम आहे. ही नैसर्गिक घटना दरवर्षी १० ते २७ फेब्रुवारी दरम्यान पाहता येते. दररोज संध्याकाळी साधारणपणे ५:३० वाजता सूर्य मावळायला लागतो, तेव्हा त्याचा प्रकाश धबधब्यावर पडतो. हा अद्भुत देखावा फक्त ३ मिनिटांसाठीच दिसतो. त्यामुळे या क्षणाची एक झलक टिपण्यासाठी लाखो पर्यटक दररोज संध्याकाळी ४ वाजल्यापासूनच योसेमाइट नॅशनल पार्कमध्ये गर्दी करत असतात.