2BHK चा फ्लॅट फक्त 154 रुपयात घेतला, या तरुणाने कसा जमवला जुगाड?

चीनमधील एका तरुणाने Alibaba लिलावातून फक्त 154 रुपये (11 युआन) मध्ये 2BHK फ्लॅट खरेदी केला. 'डबल 11' प्रमोशन अंतर्गत लिलावात त्याने बाजी मारली, जिथे मूळ किंमत 40,000 युआन होती. प्लॅटफॉर्मने ही सवलत दिली असली तरी, डीड टॅक्स आणि इतर खर्च त्याला द्यावे लागतील. स्वस्त घर खरेदीच्या कायदेशीर धोक्यांबद्दल तज्ज्ञांनी सावध केले आहे.

2BHK चा फ्लॅट फक्त 154 रुपयात घेतला, या तरुणाने कसा जमवला जुगाड?
flat china
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2026 | 11:25 AM

जगात कुठेही फक्त 154 रुपयात घर मिळू शकेल का? तोही टू बीएचकेचा फ्लॅट? ऐकूनच हसू येईल ना? किंवा केवळ स्वप्नातच असं घडू शकतं, असं वाटेल ना? तुम्हाला तसं वाटणं स्वाभाविक आहे. कारण भारत असो की चीन, जपान असो की अमेरिका प्रत्येक ठिकाणी घरे प्रचंड महागात मिळतात. अगदी आफ्रिकन देशातही एवढ्या स्वस्तात घरे मिळत नाहीत. पण तुम्हीच आता जागे व्हाच. ही संपूर्ण बातमी वाचा. मग तुम्हाला कळेल हे स्वप्न नसून सत्य आहे. एका तरुणाने चक्क 154 रुपयांचा टू बीएचकेचा फ्लॅट घेतलाय.

ही बातमी तशी चीनची आहे. त्याने काय होतंय? भारतापेक्षाही चीनमध्ये घरे महागडी आहेत. मुळात घर भारतात घेतलंय की चीनमध्ये हा मुद्दा नाही. तर या तरुणाने नक्की काय केलं आणि एवढ्या कमी किमतीत घर कसं घेतलं हा मुद्दा आहे. त्यामुळे त्याचा जुगाड तुमच्याही कामाला येऊ शकतो. साऊथ मॉर्निंग चायना पोस्टने ही बातमी दिलीय. चीनच्या एका तरुणाने केवळ 11 युआन म्हणजे 154 रुपयात दोन बेडरूमचा फ्लॅट खरेदी केला आहे. 731.95 स्क्वेअर फुटाचा हा फ्लॅट आहे. चीनच्या हेइलोंगजियांग प्रांतात त्याने हा फ्लॅट घेतला आहे. त्याला एवढ्या स्वस्तात हा फ्लॅट मिळाला कसा हा सवाल आहे.

Loading...

लिलाव झाला अन्…

Alibaba Auction वर Double 11च्या प्रमोशनच्या अंतर्गत हा लिलाव झाला. लिलावाची सुरुवात केवळ 1 युआनने सुरू झाली. त्यानंतर बोली 0.01 युआनच्या अंतरराने वाढली. नंतर सर्वाधिक बोली 11 युआनची लागली. म्हणजे जो व्यक्ती सर्वात आधी 11 युआनची बोली लावेल त्यालाच फ्लॅट मिळणार होता.

या लिलावात 1,677 लोकांनी भाग घेतला आणि एकूण 1,001 बोली लागली. 5 नोव्हेंबर रोजी लिलाव संपला आणि Jiangsu-Zhejiang क्षेत्रातील एका अनाम खरेदीदाराने केवळ 11 युआनमध्ये फ्लॅट खरेदी केला. फ्लॅट केवळ 154 रुपयांना पडला हे महत्त्वाचं नाहीये, तर फ्लॅट घेणाऱ्याला 2,000 युआन म्हणजे 28 हजार रुपयांचा डीड टॅक्स द्यावा लागणार आहे. त्याशिवाय प्रॉपर्टीशी संबंधित अन्य खर्चही द्यावे लागणार आहे. खरेदीदाराने लिलावाच्या लाइव्ह स्ट्रिममध्ये तो हेइलोंगजियांगला राहायला जाणार नसल्याचं सांगितलं. या फ्लॅटचा केवळ हिवाळ्यातील सुट्टी घालवण्यासाठी वापर करणार असल्याचं तो म्हणाला.

40 हजार युआन मूळ किंमत

फ्लॅटची खरी किंमत आणि विक्री झालेली किंमत यात मोठी तफावत आहे. स्थानिक प्रॉपर्टी अॅप्सच्या मते, या फ्लॅटची बाजारभावानुसार किंमत सुमारे 40,000 युआन होती. तसेच या कॉम्प्लेक्समधील रिसेल प्रॉपर्टीची किंमत सरासरी 2,700 युआन प्रति वर्ग मीटर असल्याचं सांगितलं आहे.

लिलाव एजन्सीच्या मते, हा Alibaba Auction च्या Double 11 प्रमोशन एक भाग होता. या ऑफरमध्ये प्रॉपर्टीची वास्तविक किंमत आणि प्रमोशनल विक्रीची किंमतीच्या मधील अंतर प्लॅटफॉर्मकडून सबसिडीच्या रुपात वसूल करण्यात येणार आहे.

सोशल मीडियात धिंगाणा

केवळ 11 युआनमध्ये फ्लॅट मिळाल्याने नेटकरी चांगलेच हैराण झाले आहेत. काही लोकांनी हा व्यवहार जबरदस्त झाल्यचं म्हटलं आहे. तर, काहींनी या प्रॉपर्टीसाठी पुढे किती खर्च येणार? असा सवाल केला आहे. कायदेशीर सल्लागारांनी मात्र अशा प्रकारची स्वस्तातील प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या प्रकारापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अशा संपत्तींचा मालकी हक्क, भरलेला टॅक्स, फिस आणि कायदेशीर वादासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us