मुंबईच्या फ्लाटावर भोजपुरी गाणं वाजलं, संजय राऊत यांनी एका वाक्यात सुनावलं
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छट पूजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजवल्याने राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. 'उत्तर प्रदेशचे राजकारण मुंबईत आणू नका आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर वरचढ होण्याचा प्रयत्न करू नका,' असा सज्जड इशारा राऊत यांनी दिला आहे.

मुंबईतील काही रेल्वे स्टेशनवर छट पूजेनिमित्ताने भोजपुरी गाणी वाजवण्यात आली आहेत. त्यामुळे आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराचे राजकीय पडसादही उमटायला सुरुवात झाली आहे. या प्रकारावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशचं राजकारण मुंबईत करू नका, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचं राजकारण मुंबईत करू नका. मुंबईचा प्लॅटफॉर्म अनाऊसमेंटसाठी आहे. गाण्यासाठी नाही. दिवाळी, होळी, ख्रिसमस आणि ईदमध्ये प्लॅटफॉर्मवर गाणी वाजवली जात नाहीत. उत्तर प्रदेशात निवडणूक आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मचा वापर होत आहे. राज्याच्या संस्कृतीवर वरचढ होऊ नका. असं केल्यानेच संघर्ष होतो. छट पूजा हा सण आहे. सण म्हणून साजरा करा. आम्हीही तुमच्या उत्सवात सहभागी होऊ, असं संजय राऊत म्हणाले.
मर्जर मर्जर खेळ ऑलिम्पिकमध्ये हवा
संजय राऊत यांनी यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मिश्किल भाष्य केलं. विलिनीकरण विलिनीकरण हा खेळ राष्ट्रीय खेळामध्ये आणला पाहिजे. ऑलिम्पिकमध्येही मर्जर मर्जर खेळ आणला पाहिजे. महाराष्ट्रात हा खेळ उत्तम सुरू आहे. लोकांचं मनोरंजन होत आहे. लोकांना या खेळात भाग घेतल्याचं वाटतंय. मोठ मोठे खेळाडू त्यात सहभागी होत आहेत. महाराष्ट्रात मर्जर मर्जरचा खेळ व्यवस्थित खेळला जात आहे. लोक ट्रेंड झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय खेळांमध्ये मर्जर मर्जर किंवा विलिनीकरण विलिनीकरणाचा खेळ समाविष्ट करा. मी पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे, असा मिश्किल टोला राऊत यांनी लगावला.
सामना अनिर्णित राहील
राष्ट्रवादीवाले अजूनही गल्लीतच खेळत आहेत. त्यांची हळूहळू प्रॅक्टिस होत आहे. हा सामना शेवटपर्यंत अनिर्णित राहील. खेळाडू खेळत राहतील. पाऊस पडेल, ढग येईल, मध्येच कोणी तरी पीच उखडेल. आमचा पक्ष या खेळावर लक्ष ठेवून नाही. हा खेळ आपआपसात खेळला जात आहे, असं ते म्हणाले.
त्यांची भिस्त फिक्सिंगवर
शरद पवार हे क्रिकेटचेच मार्गदर्शक राहतील. या खेळात ते सामील होणार नाहीत. मुख्यमंत्र्यांना या खेळात पंच म्हणून काम करायचं आहे. मला विचारा आणि निर्णय घ्या. म्हणजे फिक्सिंग. त्यांचा विषय फिक्सिंगवर असतो. आधी निकाल फिक्स करा आणि मग खेळायला जा, असं मुख्यमंत्र्यांचं धोरण असतं, असा चिमटाही त्यांनी काढला.
