
World Most Dangerous Serial Killer : मानव जातीला काळीमा फासणारे अनेक ज्ञात-अज्ञात सिरीयल किलर आहेत. त्यावरील काही रहस्य कथा, सिनेमा, मालिका आणि वेब सीरीज पाहिल्यावरच काळजाचा थरकाप उडतो. गुन्हेगारी जगतात अशाच एका सिरीयल किलरची दहशत होती. त्याचे नाव घेताच भल्याभल्यांना घाम फुटायचा. भारतातील या सिरीयल किलरचे नाव तेव्हाच्या ब्रिटिश संसदेत पण चर्चिल्या गेले होते. त्याने एक दोन वा 20-30 नाही तर तब्बल 900 लोकांचा जीव घेतला होता. रूमालाने त्याने या निरपराध माणसांचे मुडदे पाडले होते.
कोण होता तो सिरीयल किलर?
या सिरीयल किलरचे नाव ठग बेहराम असे होते. या बेहरामला ठगांचा राजा म्हटले जात असे. 1790 ते 1840 या काळात या कुप्रसिद्ध ठग बेहरामची खूपच दहशत होती. तो लुटमार करत असे. त्याकाळी दळणवळणाची आता सारखी प्रगत साधनं नव्हती. व्यापारी मार्गावर तो लक्ष ठेवत असे. त्याची एक खासियत होती. तो आणि त्याचे साथीदार व्यापारी आणि पर्यटकांच्या वेशात लुटमार करायचे. एखाद्या काफिल्यात घुसायचे. कोण श्रीमंत व्यापारी आहे, किती पैसा आहे, किती ऐवज आहे हे हेरायचे आणि नंतर योग्य संधी मिळताच तो लुटायचे. यावेळी बेहराम हा मोठ्या रुमालाने माणसांच्या गळ्यांना फास लावायचा. त्याने असे अनेक व्यापारी ठार मारले होते. तो स्त्री असो वा पुरुष कुणावरही दयामाय दाखवत नसे. कोणी त्याला संपत्ती देऊ केली तरी तो त्याला मारल्याशिवाय राहत नसे, इतका तो निर्दयी होता.
931 लोकांना केले ठार
इंग्रज जेम्स पॅटनच्या मते, बेहरामने त्याच्या संपूर्ण आयुष्यात 931 लोकांना ठार केले. त्याने हा आकडा पटकन सांगितला. आपण किती माणसं मारली हे तो फुशारकीने सांगायचा. एकाच रुमालाने त्याने अनेकांची आयुष्य संपवली. तो रूमाल तुटल्याने त्याने दुसरा रुमाल वापरला. या सर्व लोकांचा त्याने गळा आवळून अत्यंत निर्दयपणे खून केला. तडफडून तडफडून ती व्यक्ती मरत नाही तोपर्यंत तो पीळ सोडत नव्हता. असं म्हटलं जातं की, इंग्रजांना त्याला शोधण्यासाठी अनेक दिवस पाळत ठेवावी लागली.
इंग्रज सैनिक थरथरायचे
झांसी,ग्वालियर,जबलपूर आणि भोपाळमधील कोणत्या रस्त्यावर तो केव्हा येऊन गळा आवळेल हे सांगताच यायचं नाही. इंग्रज सैनिक सुद्धा या रस्त्याने जायला घाबरायचे. व्यापारी, पर्यटक, यात्रेकरू यांना तो लक्ष्य करायचा. रुमाला एक शिक्का टाकून तो गळा आवळायचा. या मार्गाने अनेक लोक त्याने गायब केले होते. विशेष म्हणजे त्यातील कित्येक लोकांची मृतदेह कधीच त्याकाळी इंग्रजांना सापडली नाहीत.
10 वर्षे लागली बेहरामला शोधायला
1809 मध्ये ब्रिटिश अधिकारी कॅप्टन स्लीमन यांच्यावर बेहरामचा शोध घेण्याची जबाबदारी देण्यात आली. ते आणि त्यांच्या पथकाने जंग जंग पछाडले. पण बेहराम त्यांच्या हाती लागला नाही. बेहरामच्या टोळीत 200 दरोडेखोर आणि खुनी असल्याची माहिती स्लीमन यांच्या हाती आली. त्यांनी मोठा फौजफाटा शोध मोहिमेसाठी लावला. 10 वर्षांनी बेहराम आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात कॅप्टन स्लीमन यांना यश आले. पुढे रीतसर त्याच्यावर खटला चालवून 1840 मध्ये त्याला मृत्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावेळी तो 75 वर्षांचा होता.