दारू पिणारे की न पिणाऱ्यांना, डास कोणाला सर्वात जास्त चावतात ?

डासांचा त्रास सर्वांनाच होतो, पण कोणाला ते कमी चावतात, तर कोणाला जास्त चावतात. पण असं का होतं याचा विचार तुम्ही केला आहे का ? याबद्दल एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली आहे..

दारू पिणारे की न पिणाऱ्यांना,  डास कोणाला सर्वात जास्त चावतात ?
डास कोणाला सर्वात जास्त चावतात ?
Image Credit source: social media
| Updated on: Sep 11, 2025 | 4:16 PM

तुम्ही हे बऱ्याचदा नोटीस केलं असेल की काही लोकांना डास जास्त चावतात, तर काहींना कमी. पण असं का होतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? अलिकडेच काही वैज्ञानिकांनी या विषयावर संशोधन केले आणि त्यातून समोर आलेले निकाल खूपच धक्कादायक आहेत. डासांचा बिअरशी थेट संबंध आहे हे जाणून अनेक लोकांना धक्का बसला. हो, हे खरं आहे, जे लोकं बिअर पितात, त्यांना अधिक डास चावतात. चला, या रिसर्चबद्दल जाणून घेऊया.

नेदरलँड्समधील शास्त्रज्ञांनी एक नवीन आणि मनोरंजक संशोधन केल, ज्यात असं दिसून आलं की, जे लोक बिअर पितात, डासांना ते जास्त आवडतात. हे संशोधन रेडबॉउड यूनिव्हर्सिटी नायमेजन (Radboud University Nijmegen)चे वैज्ञानिक फेलिक्स होलच्या टीमने केलं. BioRXiv नावाच्या शोधमंचावर या रिसर्चमधील माहिती पब्लिश करण्यात आली आहे. काही लोकांना इतरांच्या तुलनेत जास्त डास का चावतात, या मुद्यावरस वैज्ञानिक बऱ्याच काळापासून रिसर्च करत होते. आणि याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी या टीमने नेदरलँड्सच्या लोलँड्स (Lowlands) या मोठ्या म्युझिक फेस्टिव्हलमधीस हजारो डासआणइ 500 लोकांवर एक प्रयोग केला.

काय होता प्रयोग ?

त्यासाठी या संशोधकांनी त्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये एक पॉप-अप लॅब स्थापन केली. आणि मग फेस्टिव्हलमध्ये आलेल्या लोकांना त्यांचं खाण-पिणं, म्हणजेच आहार तसेच स्वच्छता आणि वर्तनाशी संबंधित काही प्रश्न विचारण्यात आले. आणि विशेष म्हणजे त्यावेळी या सहभागी लोकांना त्यांचे हात एका खास बॉक्समध्ये ठेवण्यास सांगितले, त्या बॉक्समध्ये होते डास. पण या बॉक्समध्ये लहान छिद्रं होती, जेणेकरून डासांना त्या लोकांच्या हाताचा वास तर घेता येईल पण ते त्यांना चावू शकणार नाहीत.

त्यानंतर कॅमेऱ्यांच्या मदतीने, बॉक्समधील किती डास हातावर बसतात आणि किती वेळ तिथे राहिले, याची नोंद करण्यात आली. या संशोधनाचे निकाल खूपच आश्चर्यकारक होते. त्यात असं दिसून आलं की ज्या लोकांनी बिअर प्यायली होती, ते डासांसाठी .35 पट अधिक आकर्षक असल्याचे त्यात आढळलं. एवढंच नव्हे तर आदल्या रात्री कोणासोबत बेड शेअर केलेल्या (शरीरसंबंध ठेवलेल्या) लोकांकडेही डास जास्त आकर्षित झाले. कमी सनस्क्रीन वापरणाऱ्या आणि नियमितपणे आंघोळ न करणाऱ्या लोकांकडेही डास जास्त आकर्षित झाल्याचे, या संशोधकांना दिसून आलं.

बिअर आणि डासांचं कनेक्शन

शास्त्रज्ञांच्या मते, डास थेट अल्कोहोलकडे आकर्षित होत नाहीत, तर त्यामुळे शरीरातून येणाऱ्या वासाकडे आकर्षित होतात. फेलिक्स होल म्हणाले की, बिअर पिणारे लोक अनेकदा वेगळ्या पद्धतीने वागतात, म्हणजे, जास्त नाचणे, जास्त घाम येणे, ज्यामुळे त्यांच्या शरीराचा वास बदलतो. हा वास डासांना खूप लवकर आकर्षित करतो. असेही आढळून आले आहे की डास सुमारे 350 फूट अंतरावरून माणसांचा वास ओळखू शकतात.
याचा अर्थ असा की जर एखाद्याने बिअर प्यायली असेल आणि त्याच्या शरीराचा वास बदलला असेल, तर डास दूरवरून त्याच्याकडे आकर्षित होऊ शकतात. मात्र या अभ्यासाला काही मर्यादा आहे हेही शास्त्रज्ञांनी मान्य केलं. म्युझिक फेस्टिव्हलना येणारे लोकं सामान्यत: तरूण आणि निरोगी असतात. म्हणूनच, विविध वयोगटातील आणि आरोग्य पार्श्वभूमी असलेल्या लोकांवर अधिक संशोधन करणे महत्वाचे ठरते.