थायलंडमधील एका धबधब्यात पाय सोडून बसलेला जर्मन पर्यटक, पाण्यातून अचानक आला सरडा अन्…; घडली थरकाप उडवणारी घटना
थायलंडमधील इरावान नॅशनल पार्कमध्ये, एका ६० वर्षीय जर्मन पर्यटकासोबत धक्कादायक घटना घडली आहे. नेमकं काय घडलं आहे याबद्दल जाणून घ्या.

थायलंडमधील एका प्रसिद्ध धबधब्याच्या इथे एक धक्कादायक घटना घडली. जर्मन पर्यटकासोबत घडलेल्या एका घटनेने उपस्थित लोक थक्क झाले. हा पर्यटक मस्त पाण्यात पाय टाकून बसला होता. पण पुढे मात्र जे काही घडलं त्याने तुम्हालाही धक्का बसेल. पाण्यात असताना, ६० वर्षीय पर्यटकावर अचानक एका अवाढव्य मॉनिटर लिझार्डने (घोरपडीसारख्या सरपटणाऱ्या प्राण्याने) हल्ला केला. त्या प्राण्याने त्या पर्यटकाच्या पायाला चावा घेतला आणि त्याला पाण्याखाली ओढून नेले. या हल्ल्यात पर्यटक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर, राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने आपल्या सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ही घटना थायलंडच्या कांचनबुरी प्रांतातील इरावान नॅशनल पार्कमध्ये घडली. १७ नोव्हेंबर रोजी जर्मनीतील एक वृद्ध पर्यटक इरावान धबधब्याला भेट देण्यासाठी आले होते. धबधब्याच्या पाण्यात पाय सोडून तो त्या धबधब्याचा आनंद आणि छान विश्रांती घेत होता. पण याच वेळी त्याच्यावर अचानक सरड्याने हल्ला केला.
नेमकं काय घडलं?
धबधब्याच्या पाण्यात पाय सोडून बसलेल्या पर्यटकावर सरड्याने हल्ला केला. आपल्या जबड्याने पर्यटकाचे पाय घट्ट पकडले आणि त्याला ओढत पाण्यात नेण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामुळे त्याच्या पायावर खोल जखम झाली आहे. थाई मीडिया वेबसाइट ‘थाईरथ’ (Thairath) नुसार, दुपारी १२:०० च्या सुमारास पार्कच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच, जवळच तैनात असलेले गार्डनमधले कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या पर्यटकाची मदत करत प्रथमोपचार दिले. त्यानंतर, त्या पर्यटकाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथून, अधिक विशेष वैद्यकीय उपचारांसाठी डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, उद्यानाचे अधिकारी त्या पर्यटकासोबत होते, जेणेकरून त्याला रुग्णालयात हलवताना कोणतीही अडचण येऊ नये.
अपघात विम्याद्वारे संरक्षित!
सुदैवाने, तो पर्यटक थाई सरकारच्या ‘नॅशनल पार्क्समध्ये मनःशांतीसह थायलंडचा प्रवास’ या योजनेअंतर्गत अपघात विम्याद्वारे संरक्षित होता. या योजनेमध्ये ४,००,००० थाई बाहतपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. या घटनेनंतर, इरावान नॅशनल पार्क प्रशासनाने मॉनिटर लिझार्डला (घोरपडीला) पकडून तिला दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू केली आहे.
ही घटना वन्यजीवांशी संबंधित एक अपघात म्हणून पाहिली जात आहे. वन्यजीव संवर्धन विभाग जखमी पर्यटकाला सर्व आवश्यक मदत पुरवत आहे. याव्यतिरिक्त, उद्यान प्रशासनाला जिथे पर्यटकांची मोठी गर्दी असते, अशा ठिकाणी देखरेख वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गस्त पथके आणि वनरक्षकांनाही अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.