Google Gemini Trend : ‘गुगल जेमिनाय’मध्ये फोटो करताय? IPS अधिकाऱ्याने सांगितला मोठा धोका

Google Gemini Nano Banana AI trend : सध्या असंख्य नेटकऱ्यांना 'गुगल जेमिनाय'च्या रेट्रो एआय फोटो एडिटिंगची भुरळ पडली आहे. त्यावर खासगी फोटो अपलोड केले जात आहेत. परंतु या ट्रेंडला बेसावधपणे फॉलो करण्याआधी एका आयपीएस अधिकाऱ्याने त्यामागचा धोका अधोरेखित केला आहे.

Google Gemini Trend : गुगल जेमिनायमध्ये फोटो करताय? IPS अधिकाऱ्याने सांगितला मोठा धोका
Google Gemini Nano Banana AI trend
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 16, 2025 | 11:47 AM

Google Gemini Nano Banana AI trend : ‘गुगल जेमिनाय’च्या (Google Gemini) नॅनो बनाना एआय फिचरने नेटकऱ्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. यामध्ये असंख्य नेटकरी आपले फोटो अपलोड करून त्याचं ‘रेट्रो एआय’मध्ये एडिटिंग करत सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. आतापर्यंत तुम्ही स्वत:ही ‘गुगल जेमिनाय’वरील एआयद्वारे असे फोटो एडिट केले असतील किंवा तुमच्या ओळखीतल्या व्यक्तींनी या फिचरचा वापर केलाच असेल. सोशल मीडियावर सध्या या ट्रेंडची लाटच उसळली आहे. एआयने बनवलेल्या या फोटोंनी नेटकऱ्यांना इतकी भुरळ घातली आहे, की कसलाही विचार न करता त्यावर धडाधड फोटो अपलोड केले जात आहेत. अशातच एका आयपीएस अधिकाऱ्याने लोकांना या ट्रेंडबाबत काळजी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. एआय फोटो बनवण्याच्या नादात युजर्स त्यांच्या खासगी माहितीविषयी किती बेसावध आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलंय.

आयपीएस अधिकारी व्ही. सी. सज्जनार यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर यासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, ‘इंटरनेटवरील ट्रेंड्सबाबत सावध राहा. ‘नॅनो बनाना’ ट्रेंडिंग क्रेझला बळी पडणं.. आपली खासगी माहिती ऑनलाइन शेअर करणं.. यामुळे तुम्ही स्कॅममध्ये अडकू शकता. फक्त एका क्लिकने तुमच्या बँक अकाऊंटमधील पैसे गुन्हेगारांच्या हातात जाऊ शकतात. फेक वेबसाइट्स किंवा अनधिकृत अॅप्सवर कधीच तुमचे फोटो किंवा खासगी माहिती शेअर करू नका. तुम्ही तुमचे आनंदाचे क्षण सोशल मीडिया ट्रेंड्समध्ये शेअर करू शकता, परंतु सुरक्षेला नेहमीच प्राधान्य असलं पाहिजे हे विसरू नका.’

‘ट्रेंड्स येतात आणि जातात. परंतु एकदा का फेक (बनावट) किंवा अनधिकृत वेबसाइटवर एखाद्याचा डेटा अपलोड झाला तर तो परत काढणं खूप कठीण असतं. जर तुम्ही अनोळख्या रस्त्यावर चालत असाल, तर तुमचं खड्ड्यात पडणं साहजिक आहे. तुमचे फोटो किंवा खासगी माहिती अपलोड करण्यापूर्वी दोनदा विचार करा. लक्षात ठेवा.. तुमचा डेटा, तुमचा पैसा.. ही तुमची जबाबदारी आहे’, असं लिहित त्यांनी नेटकऱ्यांना सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच त्यांनी काही बातम्यांचे स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत. नॅनो बनाना ट्रेंडमध्ये सहभागी होताना एका व्यक्तीची फसवणूक झाल्याची ही बातमी आहे.

या आयपीएस अधिकाऱ्याने त्यांच्या पोस्टमध्ये विविध लोकांना आणि प्रोफाइल्सनाही टॅग केलंय. यामध्ये पंतप्रधानांचं कार्यालय, द इंडियन सायबरक्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, तेलंगणा पोलीस यांचाही समावेश आहे.