
दातांची स्वच्छता ही आपल्या दैनंदिन आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. पूर्वीच्या काळात लोक राख, मीठ किंवा नीमच्या काड्यांद्वारे दात घासत असत. नंतर टूथपेस्ट आणि सामान्य ब्रश वापरण्याचा जमाना आला. पण आता काळ बदलतोय आणि तंत्रज्ञान झपाट्यानं पुढे जात आहे. याच टेक्नोलॉजीचा भाग म्हणजे ‘इलेक्ट्रिक टूथब्रश’. पण हा इलेक्ट्रिक ब्रश नेमका कसा काम करतो? आणि तो खरेदी करणं खरंच फायदेशीर ठरेल का? चला, याबाबत सविस्तर माहिती घेऊया.
इलेक्ट्रिक टूथब्रशमध्येही सामान्य ब्रशप्रमाणेच ब्रिसल्स (तंतू) असतात. पण फरक इतकाच की, हे ब्रिसल्स वायब्रेट होतात आणि गोलसर फिरतात. जेव्हा तुम्ही हा ब्रश चालू करता, तेव्हा हे ब्रिसल्स तुमच्या दातांभोवती हलतात, ज्यामुळे दातांमधील घाण, प्लॅक आणि अन्नाचे अंश नीटपणे साफ होतात. यामध्ये एक रिचार्जेबल बॅटरी असते, जी चार्ज करून वापरावी लागते. काही ब्रशमध्ये ‘टायमर’ फिचरही असतो, ज्यामुळे आपण brushing किती वेळ करायचं ते ठरवू शकतो.
सामान्य ब्रशमध्ये जशी हालचाल आपण हाताने करतो, तशी मेहनत इलेक्ट्रिक ब्रशमध्ये करावी लागत नाही. तुम्हाला फक्त ब्रश दातांजवळ धरायचा असतो, बाकी स्वच्छतेचं काम तो आपोआप करतो.
सध्या बाजारात मिळणाऱ्या इलेक्ट्रिक टूथब्रशची किंमत सुमारे 800 रुपयांपासून सुरू होऊन 2000 रुपयांपर्यंत जाते. काही नामांकित ब्रँड्सचे ब्रश यापेक्षाही महाग असतात. मात्र, ब्रश वापरताना एक महत्त्वाची सूचना म्हणजे, ब्रशमध्ये टूथपेस्ट लावून तो चालू करण्याआधी ब्रश तोंडात घेणं आवश्यक आहे, अन्यथा टूथपेस्ट उडून बाहेर पडू शकतो.
इलेक्ट्रिक ब्रश हे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एक चांगलं अपग्रेड आहे, पण सर्वांसाठी आवश्यक आहे असं नाही. सामान्य ब्रश 40 ते 50 रुपयांत सहज उपलब्ध होतो, आणि तोही योग्य पद्धतीनं वापरल्यास पुरेसा परिणामकारक ठरतो. त्यामुळं कमी बजेट असणाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक ब्रश घेणं फारसं फायद्याचं नाही.
मात्र, ज्यांच्याकडे बजेट आहे आणि विशेषतः लहान मुलं, ज्यांना ब्रश करणं अवघड जातं, अशांसाठी हा ब्रश उपयुक्त ठरतो. आई-वडिलांना मुलांचे दात घासून द्यावे लागतात अशावेळी, हा ब्रश खूप मदतीचा ठरू शकतो. वेळही वाचतो आणि मुलांची दात घासण्याची प्रक्रियाही अधिक सोपी होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)