
आजचं युग जरी फायटर जेट्स आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचं असलं, तरीही हँड ग्रेनेडचं महत्त्व अजूनही संपलेलं नाही. लहान ऑपरेशन्स, दहशतवाद्यांविरोधातील कारवाया किंवा विशिष्ट ठिकाणं उद्ध्वस्त करण्यासाठी आजही या छोट्या पण अत्यंत घातक शस्त्राचा वापर केला जातो. त्यामुळेच ‘हँड ग्रेनेड’ म्हणजे काय, तो कसा काम करतो, आणि त्यापासून वाचण्यासाठी किती वेळ मिळतो हे जाणून घेणं गरजेचं आहे.
हँड ग्रेनेड मुख्यतः तीन भागांपासून बनलेला असतो.
1. पहिला भाग म्हणजे त्याची बॉडी, यामध्ये स्फोटक भरलेलं असतं.
2. दुसरा भाग फ्यूज मेकॅनिझम ज्यामध्ये पिन, लीव्हर (spoon) आणि इग्निशन सिस्टम असतो.
3. तिसरा भाग असते सेफ्टी पिन, जी ग्रेनेड वापरण्याआधी खेचली जाते.
जेव्हा एखादा सैनिक ग्रेनेडची पिन खेचतो, तेव्हा तो अजूनही निष्क्रिय असतो. तोपर्यंत तो स्फोट करत नाही, जोपर्यंत लीव्हर सोडला जात नाही. लीव्हर सुटताच आतला इग्निशन सिस्टीम सक्रिय होतो आणि स्फोटाच्या दिशेने वेळ मोजायला सुरुवात होते.
सर्वसामान्यपणे वापरला जाणारा M67 अमेरिकन ग्रेनेड सुमारे 4 ते 5 सेकंदात स्फोट होतो. म्हणजेच, पिन खेचल्यावर आणि लीव्हर सोडल्यानंतर, वापरकर्त्याकडे फेकण्यासाठी 4-5 सेकंदचाच वेळ असतो. काही ग्रेनेड्सचा वेळ याहून कमी म्हणजे 3 सेकंदांचाही असतो, तर काही प्रगत मॉडेल्समध्ये हा वेळ 7 सेकंदांपर्यंत वाढवलेला असतो.
हा वेळ एक प्रकारचा ‘डिले फ्यूज’ (Delay Fuse) असतो, जो सैनिकाला ग्रेनेड योग्य जागी फेकण्यासाठी काही क्षण देतो, आणि त्याचबरोबर स्वतःपासून स्फोट दूर ठेवण्याची संधीही.
जर ग्रेनेड तुमच्यापासून काही मीटर अंतरावर फेकला गेला असेल, तर तुमच्याकडे वाचण्यासाठी अंदाजे 3 ते 4 सेकंद असतात. पण, वाचणं ही गोष्ट अनेक गोष्टींवर अवलंबून असते जसं की:
* जर तुम्ही खुल्या जागेत असाल, तर तुम्हाला लगेच जमिनीवर झोपून किंवा कोणत्यातरी कवरमागे जावं लागेल.
* ग्रेनेडचा मुख्य स्फोटक परिणाम 5 ते 15 मीटरच्या आत असतो, पण त्याचे तुकडे (shrapnel) 50 मीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत जाऊ शकतात.
हँड ग्रेनेड जरी छोटा वाटत असला, तरी त्याची मारक क्षमता अत्यंत घातक आहे. पिन खेचल्यावर मिळणारे 4-5 सेकंद म्हणजे जीवन-मरणाचा निर्णय करणारे क्षण असतात. आजच्या आधुनिक लढायांमध्ये त्याचं महत्त्व कमी झालं असलं, तरी काही विशिष्ट परिस्थितींमध्ये हँड ग्रेनेड अजूनही अत्यंत प्रभावी आणि धोरणात्मक शस्त्र ठरतो. त्यामुळे, याबाबतची माहिती सामान्य नागरिकांनाही असणं फारच महत्त्वाचं आहे.