
भारतात दररोज लाखो प्रवासी विमानाने प्रवास करतात. विशेषतः जे प्रवासी लांबच्या अंतरावर जातात, ते रेल्वे किंवा बसपेक्षा विमानप्रवासालाच प्राधान्य देतात. मात्र विमानप्रवास अधिक आरामदायक व्हावा यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे “आपल्या आवडती सीट” मिळणे. विंडो सीटवर बसून आकाशातून खालचा नजारा पाहायची मजा काही औरच! पण नेमकी हीच सीट आपल्याला मिळेल कशी?
जेव्हा तुम्ही विमानाचं तिकीट बुक करता, तेव्हा अनेक एअरलाईन्स ‘सीट सिलेक्शन’चा पर्याय देतात. मात्र बऱ्याच प्रवासी हा पर्याय दुर्लक्षित करतात. ते केवळ वेळ आणि भाडं पाहून तिकीट बुक करतात. त्यामुळे शेवटी सिस्टीमद्वारे कोणतीही सीट त्यांना आपोआप अलॉट होते. म्हणूनच, जेव्हा सीट निवडण्याचा पर्याय असेल, तेव्हा तो नक्की वापरा.
जर तुम्हाला खास विंडो सीटवर बसायचं असेल, तर तिकीट बुक करतानाच ती निवडा. एकदा बुकिंग झाल्यानंतर नंतर बदल करणे कठीण होऊ शकते. अनेकदा विंडो, एक्सिट रो किंवा फ्रंट रो अशा प्रीमियम सीट्ससाठी थोडं जास्त शुल्क लागतो. पण या सीट्स अधिक आरामदायक आणि स्पेसयुक्त असतात, विशेषतः लांबच्या फ्लाइट्ससाठी.
फ्लाइटमधील प्रवास अधिक आरामदायक हवा असेल, तर लेग स्पेसला प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. विशेषतः लांब प्रवासात पाय मोकळे ठेवण्याची गरज अधिक जाणवते. यासाठी ‘एक्सिट रो’ किंवा ‘फ्रंट रो’ सीट्स हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. या सीट्समध्ये सामान्य सीट्सपेक्षा अधिक जागा असते, ज्यामुळे पाय मोकळेपणाने ठेवता येतात आणि थकवा कमी होतो. मात्र अशा सीट्ससाठी अनेक वेळा अतिरिक्त शुल्क आकारले जाते, तरीही त्या आरामदायक प्रवासासाठी मूल्यवान ठरतात. त्यामुळे जर तुम्हाला लेग स्पेस हवी असेल, तर बुकिंग करताना या सीट्स निवडणं नक्कीच फायदेशीर ठरेल.
फ्लाइटच्या प्रस्थानापूर्वी २४ ते ४८ तास आधी वेब चेक-इन सुरु होतं. यावेळी अनेक सीट्स उपलब्ध असतात आणि तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या पसंतीची सीट निवडू शकता. त्यामुळे वेब चेक-इनला अजिबात उशीर करू नका. जेव्हा ही विंडो उघडेल, तेव्हा लगेच लॉग इन करून सीट बुक करा.