Snake News : दुकानात मस्त उभा होता, समोर गारुडी दिसताच रीलचा विचार डोक्यात आला, वेळ वाईट होती..
Snake News : माणसाचा चांगला टाईम सुरु असताना अनेकदा काही माणसं स्वत:च्या हाताने सर्व काही बिघडवतात. रिंकूच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं. रिंकूचं मिठाईचं दुकान आहे. तो दुकानात उभा होता. समोर गारुडी दिसला. तिथूनच खराब वेळ सुरु झाली.

सोशल मीडियावर चांगल्या रिल्सला लाइक्स आणि व्यूज मोठ्या प्रमाणात मिळतात. लोकांमध्ये सध्या या रील्सची इतकी क्रेज आहे की, त्यासाठी अनेक जण आपल्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाहीत. खतरनाक स्टंट दाखवून लोकांचं लक्ष वेधून घेण हाच त्यांचा प्रयत्न असतो. कधी धावत्या ट्रेनवर स्टंट तर कधी विषारी प्राण्यांसोबत खेळतानाचा व्हिडिओ बनवून जीव धोक्यात टाकण्याचं प्रमाण वाढलं आहे. उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यात असचं अंगावर काटा आणणारं एक प्रकरण समोर आलय. एक मिठाई दुकानदार रील बनवण्याच्या नादात विषारी सापाचा बळी ठरला असता. दुसरीकडे बिजनौर जिल्ह्यात म्हशींच्या गोठ्यात सफाई करणाऱ्या एका शेतकऱ्याला सापाने दंश केला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना औरैया जिल्ह्यातील अछल्दा ब्लॉक मधील आहे. इथे राहणारे 40 वर्षी रिंकू यांचं मिठाईचं दुकान आहे. गुरुवारी दुपारी एका गारुडी सापाला घेऊन जात होता. गारुड्याला बघून रिंकू यांच्या मनात रील बनवण्याचा विचार आला.
व्हिडिओ जास्त आकर्षक आणि व्हायरल व्हावा यासाठी रिंकू यांनी गारुड्याकडून तो साप आपल्या हातात घेतला. रिंकूने साप हातात घेऊन त्याच्याशी खेळ सुरु केला. त्यांनी साप आपल्या गळ्यात अडकवला. जवळ असलेले लोक या घटनेचा व्हिडिओ बनवत होते. ही स्टंटबाजी सुरु असताना अचानक सापाने रिंकूच्या हातावर दंश केला. प्रत्यक्षदर्शींनुसार सापाने दंश करताच रिंकूच्या हातातून रक्तस्त्राव सुरु झाला. रिंकूला आधी ही घटना सामान्य वाटली. त्याने गारुड्याला आपल्या गावच्या भाषेत विचारलं, काही झालं तर नाही ना?
लगेच हात सुजला
सुरुवातीला रिंकू काही झालं नाही, सामान्य आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत होता. पण लगेच हात सुजला, त्याला वेदना होऊ लागल्या. आसपासचे लोक घाबरले. स्थानिक नागरिक आणि नातेवाईक लगेच रिंकूला खासगी वाहनाने जवळच्या सामुदायिक स्वास्थ्य केंद्रावर घेऊन गेले. रिंकूला तिथे दाखल करुन लगेच उपचार सुरु केले. सीएचसी अछल्दाचे डॉक्टर गौरव म्हणाले की, ग्रामस्थांनी रिंकूला वेळेत हॉस्पिटलमध्ये आणलं. त्यामुळे विष शरीरात पसरण्यापासून रोखता आलं. प्राथमिक उपचार आणि अँटी-स्नेक वेनम दिल्यानंतर रिंकूला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं आहे. सध्या रिंकूची प्रकृती धोक्याबाहेर आहे.