
जगात सौंदर्याचे निकष प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत. एकीकडे सडपातळ शरीर आणि सिक्स-पॅक अॅब्सला सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. तर दुसरीकडे इथियोपियातील बोडी जमातीमध्ये सुटलेलं पोट आणि स्थूल शरीरच पुरुषांना सर्वात देखणे बनवते. होय, तुम्ही बरोबर वाचलं! बोडी जमातीमध्ये बाहेर निघालेले पोट आणि फुगलेले गाल केवळ पुरुषांना आकर्षक बनवत नाहीत, तर त्यांना लग्नासाठी सर्वात योग्य उमेदवारही बनवतात.
काय आहे भानगड?
इथियोपियाच्या ओमो खोऱ्यात राहणारी बोडी जमात, जी मीन (Me’en) नावानेही ओळखली जाते, तिच्या अनोख्या सांस्कृतिक परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी जूनमध्ये काएल (Ka’el) समारोह आयोजित केला जातो, जो जमातीचा नववर्ष उत्सव आहे. या समारोहाचे मुख्य आकर्षण आहे पुरुषांमधील सर्वात स्थूल होण्याची स्पर्धा. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक कुटुंब आपल्या घरातील अविवाहित पुरुषाची निवड करते. हा पुरुष पुढील सहा महिने विशेष आहार आणि जीवनशैलीचे पालन करतो. या काळात ते गायीचे रक्त आणि दूध यांचे मिश्रण सेवन करतात, ज्यामुळे त्यांचे वजन झपाट्याने वाढते.
दिला जातो खास आहार
या अनोख्या प्रक्रियेत पुरुषांना त्यांच्या झोपडीत सहा महिने राहावे लागते. या काळात त्यांना कोणतीही शारीरिक हालचाल करण्याची किंवा लैंगिक संबंध ठेवण्याची परवानगी नसते. महिला आणि मुली त्यांच्यासाठी गायीचे ताजे रक्त आणि दूध आणतात. बोडी जमातीमध्ये गाय पवित्र मानली जाते, त्यामुळे अनोख्या पद्धतीने रक्त काढण्यात येते. नंतर मातीने ते बंद केले जातो. जेणेकरून गायीचा जीव वाचेल.
हा आहार सेवन करणे सोपे नाही. उष्ण हवामानामुळे रक्त लवकर गोठते आणि स्पर्धकांना सकाळी-सकाळी दोन लिटर रक्त आणि दूधाचे मिश्रण त्वरित प्यावे लागते. अनेक पुरुष इतक्या प्रमाणात आहार पचवू शकत नाहीत आणि उलटी करतात. तरीही, जे या आव्हानाला पार करतात, ते काएल समारोहाच्या दिवशी आपले स्थूल शरीर प्रदर्शित करतात. समारोहाच्या दिवशी, पुरुष आपल्या शरीरावर माती आणि राख लावतात आणि शहामृगाच्या पंखांपासून बनवलेले डोक्याचे दागिने घालतात. नंतर ते एका पवित्र झाडाभोवती तासन्तास प्रदक्षिणा घालतात, जिथे जमातीचे इतर लोक आणि महिला त्यांचा उत्साह वाढवतात.
या स्पर्धेचा विजेता तो पुरुष ठरतो, ज्याचे पोट सर्वात मोठे असते. त्याला कोणतेही भौतिक बक्षीस मिळत नाही, पण तो आयुष्यभरासाठी जमातीचा नायक बनतो. बोडी जमातीच्या महिला मोठ्या पोटाच्या पुरुषांना अत्यंत आकर्षक मानतात आणि अशी समजूत आहे की त्या या पुरुषांशी लग्न करण्यासाठी उत्सुक असतात. समारोहानंतर, पुरुष सामान्य आहाराकडे परत येतात आणि काही आठवड्यांतच त्यांचे वाढलेले वजन कमी होते. पण त्यांची नायकाची प्रतिमा आयुष्यभर कायम राहते. बोडी जमातीमध्ये प्रत्येक मुलाचे स्वप्न असते की मोठे होऊन तो या स्पर्धेत सहभागी व्हावे आणि नायक बनावे.