जिवंतपणी लोक आपल्या अंत्य संस्काराची बुकिंग करतायत, चार खांद्यांपासून अस्थी विसर्जनापर्यंत…सर्वच एका क्लिकवर, नव्या बिझनेसची सगळीकडे चर्चा
एखाद्या घरातील माणूस देवाघरी गेल्यावर घरातल्या लोकांची अंत्यसंस्काराच्या वस्तूंसाठी प्रचंड धावपळ उडते. हीच गरज किंवा कारण समजून एका कंपनीने याचा व्यवसाय सुरू केलाय ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या अंत्यसंस्काराची तयारी आधीच करता येणार असून चार खांद्यांपासून ते अस्थी विसर्जनापर्यंतची व्यवस्था आहे.

लग्नाची तयारी असो, घर खरेदी करायचं असो किंवा फिरायला जायचं असो, आपण अनेक गोष्टिंचे आधीच नियोजन करतो. पण स्वत:च्या अंत्यसंस्काराचं नियोजन कोणी आधीच करेल, असा विचार तरी कधी केला आहे का? एका स्टार्टअपने मात्र हिच कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. आता माणूस जीवंत असतानाच तो त्याच्या स्वत:च्या किंवा दुसऱ्याच्या अंत्यसंस्कराची तयारी करू शकता. माणूस जीवंत असतानाच त्याच्या शेवटच्या प्रवासाची व्यवस्था करून ठेवू शकतो. हा बिझनेस सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडमध्ये आहे.
मोक्ष व्हॉयेज असं या स्टार्टअपचं नाव असून ते नमो गंगे वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत चालवलं जातं. अंत्यसंस्काराच्या वेळी कुटुंबीयांना होणारी धावपळ कमी व्हावी आणि धार्मिक विधी व्यवस्थित पार पडावेत. हा या सेवेचा उद्देश असल्याचं सांगितलं जातं.
चार खांद्यांपासून ते अस्थी विसर्जनापर्यंतची व्यवस्था
या स्टार्टअपकडून अंत्यसंस्काराशी संबंधित विविध सेवा दिल्या जातात. पार्थिव शरीराला खांदा देण्यासाठी चार व्यक्तींची व्यवस्था, पार्थिव शरीर स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी वाहन अंत्यसंस्कारासाठी लाकूड, फूल आणि पूजेचं साहित्य उपलब्ध करून दिलं जातं.
याशिवाय अंत्याविधी करण्यासाठी पंडित, धार्मिक विधी, अस्थी संकलन आणि अस्थी विसर्जनाची व्यवस्थाही केली जाते. श्राद्धांविधींसाठी मदत मिळू शकते. अस्थी विसर्जनासाठी नाव आणि घटाची व्यवस्थाही करण्याची सुविधा या सेवेत आहे.
पॅकेजची किंमत 6, 000 पासून दिड लाखांपर्यंत
या सेवांसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. निवडलेल्या सेवा आणि विधींनुसार पॅकेजची किंमत साधारण 6,000 रूपयांपासून ते 1.5 लाखं रूपयांपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच कुटुंबाला कोणत्या प्रकाराच्या सेवा हव्या आहेत, त्यानुसार खर्च ठरतो.
हा स्टार्टअप दिल्ली – एनसीआरसह भारतातील इतर काही शहरांमध्येही सेवा देत असल्याचं वृत्त आहे. इंडिया इंटरनॅशनल सेवा देत असल्याचं वृत्त आहे. इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअरमध्येही या स्टार्टअपचा स्टॉल लावण्यात आला होता. या सेवेसाठी 300 हून अधिक लोकांनी नोंदणी केल्याचा दावा करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
स्वत:च्या अंत्यसंस्काराचं जिवंतपणीच बुकिंग करण्याची कल्पना अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे. काहींना ही सेवा कुटुंबीयांची धावपळ कमी करणारी व्यावहारिक व्यवस्था वाटत आहे. तर काही जण मूल्य आणि धार्मिक विधींच व्यावसायिकीकरणं होत असल्याचा प्रश्न उपस्थित करत आहेत.