
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. खासकरून हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. अशातच आता मंडी जिल्ह्यातील चौहरघाटी येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक कमला नावाची नर्स खडकांवरून उडी मारून धोकादायक नाला पार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्हायरल व्हिडिओ मंडी जिल्ह्यातील चौहरघाटी येथील आहे. या नर्सने बाळाचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला होता. जर या महिलेकडून छोटी चूक झाली असती तर ती पाण्यात पडली असती आणि तिचा जीव गेला असता, मात्र सुदैवाने असं काही घडले नाही.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नाला ओसांडून वाहत आहे. जर नाल्यात काही पडले तर तो ते सहजपणे वाहून नेईल. मात्र तरीही धाडस करत या नर्सने बुडलेल्या दगडांवर संतुलन साधत उडी मारली आणि धोकादायक नाला पार केला. त्यामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
Meet Staff Nurse Kamla, who risked her life to ensure a two-month-old baby received a crucial injection. With the bridge in her area swept away, she crossed the river to reach the child. She is From Paddhar’s Chauharghati, Mandi. @CMOFFICEHP @mansukhmandviya @nhmhimachalp @WHO pic.twitter.com/o9JFmIHskx
— Vinod Katwal (@Katwal_Vinod) August 23, 2025
याबाबत बोलताना नर्सने म्हटले की, मला सीएचसीकडून एक महत्त्वाचा फोन आला होता. मला कोणत्याही परिस्थिती त्या ठिकाणी पोहोचायचे होते, त्यामुळे मी उडी मारली. मुसळधार पावसामुळे पादचारी पूल वाहून गेला आहे, त्यामुळे ड्युटीवर पोहोचणे हे एक युद्ध बनले आहे. आम्हाला काहीवेळा 4 किलोमीटर पायी चालून नोकरीच्या ठिकाणी जावे लागते.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर आता तो तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांना या नर्सच्या धाडसाचे कौतुक केले आहे. बऱ्याच लोकांनी या नर्सला तिच्या या मेहनतीचे योग्य बक्षीस मिळायला हवे असे विधान केले आहे. तसेच आणखी एकाने आपल्या देशाला अशा लोकांची नितांत गरज आहे असं म्हणत या नर्सचे कौतुक केले आहे.