भारतात 40 रुपये किलो मिळणाऱ्या भेंडीची अमेरिकेत एवढी किंमत? आकडा ऐकून डोळे पांढरे होतील!
भारतात ४० ते ५० रुपये किलो मिळणारी भेंडी अमेरिकेत तब्बल ७,२५० रुपये किलो दराने विकली जात आहे. इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आशिष आहुजाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय घरांमध्ये आठवड्यातून किमान दोनदा तरी ताटात असणारी, लहान मुलांची लाडकी आणि गृहिणींसाठी झटपट होणारी साधी-सुलभ भाजी म्हणजे भेंडी. भारतीय बाजारात भेंडी फार-फार तर ४० ते ५० रुपये किलोने मिळतात. मात्र सध्या सोशल मीडियावर हीच भेंडी जोरदार चर्चेत आहे. कारण आपली हीच साधी भेंडी सातासमुद्रापार अमेरिकेत चक्क ७,२५० रुपये किलो दराने विकली जात असल्याचे समोर आले आहे. इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आशिष आहुजाने याबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे सर्वजण चकित झाले आहेत.
आपण बाजारात गेलो की भेंडी कोवळी आहे की नाही हे पाहण्यासाठी तिचे टोक मोडून बघतो. पण अमेरिकेतील एका सुपरमार्केटमध्ये भेंडीचे अगदी छान स्टाईलमध्ये दिली जाते. आशिष आहुजाने जेव्हा या सुपरमार्केटला भेट दिली, तेव्हा त्याला कच्ची भेंडी कुठे दिसलीच नाही. त्याऐवजी तिथे एका पाकिटांमध्ये बंद असलेली, मस्त मसाल्यात घोळवलेली आणि कुरकुरीत तळलेली भेंडी (Crispy Fried Okra) विकली जात होती.
जेव्हा आशिषने त्याची किंमत पाहिली, तेव्हा त्याला झटकाच बसला. अवघ्या ८५ ग्रॅमच्या भेंडीच्या चिमुकल्या पाकिटाची किंमत ६.५ डॉलर्स इतकी होती. याचाच अर्थ आपल्या चलनात सुमारे ६०० रुपये. जर या हिशोबाने हिशोब केला, तर १ किलो भेंडीसाठी अमेरिकतील लोकांना तब्बल ७,२५० रुपये मोजावे लागत आहेत. इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आशिष आहुजा याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून परदेशी बाजारपेठेत भारतीय भाज्यांचे कशा प्रकारे ब्रँडिंग केले जात आहे आणि त्यांची किंमत किती पटीने वाढवली जाते, याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान त्याच सुपरमार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय ब्रँडचे लेज (Lays) चिप्सचे पाकीट २.५० डॉलर्सला मिळत असताना, भेंडीचे पाकीट मात्र त्याच्या दुप्पट म्हणजेच ६.५ डॉलर्सला विकले जात होते. या अवाढव्य किमतीवर आशिष आहुजाने मिश्किल भाष्य केले. त्याने या वाढीव किमतीला भेंडीचा ‘पर्सनॅलिटी टॅक्स’ (व्यक्तिमत्व कर) असे म्हटले. तसेच, “आपण कधी या पातळीवर पोहोचू, हे खुद्द भेंडीलाही माहीत नसेल,” असा टोमणाही त्याने मारला.
स्मार्ट मार्केटिंगची कमाल
भारतात स्वस्त मिळणारी ही भाजी अमेरिकेत इतकी महाग कशी झाली, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे खरे उत्तर उत्तम पॅकेजिंग आणि स्मार्ट मार्केटिंगमध्ये दडलेले आहे
- आरोग्यदायी नाश्ता (Healthy Snack): अमेरिकेत भेंडीला केवळ भाजी न मानता एक ‘हेल्दी स्नॅक’ म्हणून प्रमोट केले जात आहे.
- प्रोसेसिंग आणि चव: ही भेंडी खास पद्धतीने तळून आणि परदेशी ग्राहकांच्या आवडीचे मसाले लावून तयार केली जाते, ज्यामुळे ती दीर्घकाळ टिकते.
- प्रीमियम टॅग: आरोग्याबाबत जागरूक असलेल्या अमेरिकन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या उत्पादनाला ‘प्रीमियम’ दर्जा देण्यात आला आहे.