
होळी हा भारतातील सर्वांत मोठ्या सणांपैकी एक आहे. हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यात साजरा केल्या जाणाऱ्या या सणाचं विशेष महत्त्व आहे. भारतासोबतच हा सण इतरही काही देशांमध्ये अत्यंत उत्साहात साजरा केला जातो, जिथे भारतीय राहतात. परंतु तुम्हाला पाकिस्तानमधील अशी एक जागा माहीत आहे का, ज्याचं होळीशी खूप मोठं कनेक्शन आहे. पाकिस्तानमधील या ठिकाणी एकेकाळी तब्बल नऊ दिवस होळी साजरी केली जायची. आता ‘महावतार नरसिम्हा’ या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे ही जागा पुन्हा चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या अखेरीस पाकिस्तानच्या मुल्तानमधील प्रल्हादपुरी मंदिराचा फोटो दाखवण्यात आला आहे. तेव्हापासून या मंदिराविषयी जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा आहे.
भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपु आणि होलिका यांच्यातील घटना पाकिस्तानात घडली होती. ज्याठिकाणी होलिका दहन झालं, त्याच ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलं आहे. हजारो वर्षांपूर्वी ज्याठिकाणी हे मंदिर बांधलं गेलं होतं, ती जागा आज पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुल्तान शहरात आहे. या मंदिराचं नाव प्रल्हादपुरी मंदिर असं आहे. याच ठिकाणी भक्त प्रल्हादची आत्या होलिका आगीत भस्म झाली होती. लोककथेनुसार ही तीच जागा असल्याने तिथे सर्वांत आधी होलिका दहन साजरी करण्यात आली.
हजारो वर्षे जुन्या या प्रल्हादपुरी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 1861 मध्ये लोकांनी देणग्या गोळा केल्या होत्या. नंतर 1947 मध्ये भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी प्रल्हादपुरी मंदिर पाकिस्तानात गेलं. त्यानंतरही होळीच्या दिवशी तिथे भाविकांची मोठी गर्दी जमायची. तिथे दोन दिवस होलिका दहन केलं जात असे. त्यानंतर नऊ दिवस होळी मेळा आणि रंगोत्सव साजरा केला जात असे.
1992 मध्ये जेव्हा अयोध्येत बाबरी मशीदीचा भाग पाडण्यात आला तेव्हा मुल्तानमधील काही मुस्लीम कट्टरपंथीयांनी प्रल्हादपुरी मंदिर पाडलं होतं. त्यानंतर पंजाब सरकारनेही त्याकडे विशेष लक्ष घेतलं नाही. परंतु काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या न्यायालयाने या मंदिराच्या दुरुस्तीचे आदेश दिले होते. तरीही आतापर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. सध्या हे मंदिर जीर्ण अवस्थेतच आहे.