‘महावतार नरसिम्हा’च्या बजेटविषयी दिग्दर्शकांचा खुलासा; सांगितलं ॲनिमेशनमध्ये बनवण्यामागचं कारण
जगभरात 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या 'महावतार नरसिम्हा'चा नेमका बजेट किती आहे, हे तुम्हाला माहितीये का? याविषयी दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
‘महावतार नरसिम्हा’ हा देशातील सर्वांत मोठा ॲनिमेटेड चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचं यश संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे. अवघ्या 16 दिवसांत 169 कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अश्विन कुमारने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. यामध्ये भगवान विष्णूच्या चौथ्या अवताराची कथा दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ हिंदूंकडूनच नाही तर विविध समुदायातील प्रेक्षकांकडून या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव होतोय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक या चित्रपटाच्या यशाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. यावेळी त्यांनी चित्रपटाचा नेमका बजेट किती होती, त्याचाही खुलासा केला आहे.
‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत अश्विन कुमार म्हणाले, “जेव्हा एखादा चित्रपट पहिल्याच आठवड्यात 100 कोटी रुपये कमावतो, तेव्हा खरंच हा एक वेगळाच आनंद असतो. इतक्या कमाईची आम्ही अपेक्षासुद्धा केली नव्हती. आपल्या देशात विविध धर्माचे आणि संस्कृतीचे लोक एकत्र राहतात. कदाचित याच विविधतेमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला इतका भावला आहे. आम्ही प्रेक्षकांना एक वेगळा आणि ग्रँड ॲनिमेशनचा अनुभव दिला, जो भारतीय चित्रपटसृष्टीत फार क्वचित पहायला मिळतो. भारतात ॲनिमेशन चित्रपट हे लहान मुलांसाठीच असतात, असा अनेकांचा समज होता. परंतु आमच्या चित्रपटाने हाच विचार बदलला आहे.”
View this post on Instagram
“या चित्रपटाच्या यशामुळे अनेक ॲनिमेशन चित्रपटांसाठी दरवाजे खुले झाले आहेत. निर्माते आणि क्रिएटर्सना हे समजण्याची खूप गरज आहे की ॲनिमेशन एक शक्तीशाली माध्यम आहे. हॉलिवूड, चीन, जपान आणि कोरिया हे गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. भारतात यावर फार कमी काम झालंय. महावतार नरसिम्हाच्या कथेसाठी ॲनिमेशनच योग्य पर्याय होता. लाइव्ह ॲक्शनमध्ये नरसिम्हा स्वामींचे आठ हात, विशाल युद्ध आणि जगाच्या विनाशाचं चित्रीकरण करणं खूप कठीण झालं असतं. ॲनिमेशनमध्ये तुमचे विचारच तुमची मर्यादा असते आणि त्यात कोणत्याही स्टारची गरज नसते. कथेत दम असेल तर प्रेक्षक आकर्षित होतात”, असं त्यांनी सांगितलं.
दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी या चित्रपटासाठी आपलं सर्वस्व झोकून दिलं होतं. ज्या ज्या वेळी त्यांच्यासमोर समस्या निर्माण झाल्या, तेव्हा त्यांनी नरसिम्हा देवाकडेच शक्ती मागितली आणि त्यांच्या आशीर्वादाने पुढे प्रयत्न करत राहिले. या मुलाखतीत त्यांनी चित्रपटाच्या बजेटचा नेमका आकडाही सांगितला आहे. ते पुढे म्हणाले, “काहींनी म्हटलंय की हा चित्रपट 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. परंतु खरा बजेट हा 40 कोटी रुपये इतका होता. यामध्येच मार्केटिंगसुद्धा समाविष्ट होतं. तुमच्यात इच्छाशक्ती असली तर कमी बजेटमध्येही चांगला चित्रपट बनू शकतो. “
