
मुख्यमंत्र्यांपासून ते विविध खात्याचे मंत्री, पालकमंत्री जनता दरबार घेतात. या दरबारात लोकांच्या ज्या तक्रारी असतात. त्याची दखल घेण्यात येते. त्यांची अडवणूक होत असेल. त्यांचा छळ होत असेल तर त्याबाबत ते तक्रार करतात. संबंधित विभागाला मंत्री ती समस्या दूर करण्याचे आदेश देतात. कधी कधी अधिकार्याची खरडपट्टी काढली जाते. पण या जनता दरबारात या व्यक्तीने वेगळीच कैफियत मांडली. त्याची बायको शेजाऱ्यासोबत पळून गेली. त्याने यासंदर्भात मंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आणि काही करून बायकोला परत आणा असा टाहो फोडला.
राजस्थानमधील रामगंजमंडी विधानसभा क्षेत्रात खीमच या गावात सोमवारी जनता दरबार घेण्यात आला. तेव्हा हे प्रकरण समोर आले. राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांच्यासमोर एक तरूण आला. त्याची प्रशासनाविषयी काही तक्रार असेल, असे सर्वांना वाटले. त्याच्यासोबत दोन लहान मुली होत्या. त्याने आपली पत्नी शेजाऱ्यासोबत पळून गेल्याचे आणि तिला शोधून आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. त्यामुळे सभागृहातील सर्वच जण काही क्षण गोंधळले. अवाक झाले.
तरुणाने मांडली कैफियत
शेजाऱ्यासोबत पळून गेल्याचा आरोप
या तरुणाने सांगितले की पत्नी शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत पळून गेली. त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. त्या दोघांचे लग्न काही वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना दोन मुली आहेत. पत्नी असे काही करेल असे त्याला वाटले नव्हते. पत्नीने घरातून दागिने आणि रोख रक्कम सुद्धा पळवल्याचा आरोप तरुणाने केला. पोलिसांमध्ये तक्रार दाखल करून सुद्धा काहीच कारवाई झाली नसल्याची कैफियत त्याने मांडली. त्याची पत्नी सर्व दागिने घेऊनच रफू चक्कर झाली नाही तर तिच्या महिला खात्याचे पासबूक, एका फायनान्स कंपनीचे कर्ज काढलेले कागदपत्रे, इतर महत्त्वाची कागदपत्रे घेऊन पसार झाली.
तिला शोधून आणा
हा तरुण दोन मुलीसह जनता दरबारात आला होता. त्यातील एका मुलीचे वय 5 तर दुसरीचे 9 वर्षे असे होते. तर त्याची दोन वर्षाची मुलगी पत्नी सोबत घेऊन गेल्याचे त्याने सांगितले. दोन्ही मुली आईच्या आठवणीत रडत असल्याचे तो म्हणाला. आरोपीच्या भावाला तो कुठे लपला आहे, याची संपूर्ण माहिती आहे, पण पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप पतीने केला. त्यानंतर मंत्री मदन दिलावर यांनी तात्काळ पोलिसांना महिलेचा शोध घेण्याचे आदेश दिले. याप्रकरणी हरवल्याची नोंद केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच महिलेला शोधून काढण्याचे आश्वासन दिले.