
‘गाव’ हा शब्द कानावर पडताच आपल्या डोळ्यांसमोर कच्ची घरे, विहिरी, हिरवीगार शेतं, मेहनती शेतकरी, विहिरीवर पाणी भरणाऱ्या महिला, नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिला आणि कच्च्या रस्त्यांची चित्रे येतात. आजही अनेक गावांमध्ये वीज, पाणी, पक्के रस्ते, चांगली शाळा किंवा मोठे रुग्णालय यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पण भारतात एक असे गाव आहे, जे मोठमोठ्या शहरांनाही लाजवेल. हे भारतातील सर्वात श्रीमंत गाव आहे, जिथे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. आता तुम्हीही विचार करत असाल की नेमकं हे गाव आहे तरी कुठे? चला जाणून घेऊया…
गावाचे नाव काय?
हे गाव गुजरातमधील माधापार आहे, जे केवळ भारतातच नव्हे, तर जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. या गावाची एकूण लोकसंख्या सुमारे 92,000, म्हणजेच जवळपास एक लाख आहे. येथे 7,600 घरे आहेत. विशेष म्हणजे, या गावात एक-दोन नव्हे, तर तब्बल 17 बँक शाखा आहेत. माधापार गावाची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आहे. गावकऱ्यांनी या बँकांमध्ये 5 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली आहे. एवढी मोठी रक्कम मोठमोठ्या शहरांमधील बँकांमध्येही क्वचितच जमा होते. त्यामुळे गावात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा करोडपती आहे. या गावातील मुलांशी लग्न करण्यासाठी इतर गावातील मुली अक्षरश: उतावळ्या असतात असे म्हटले जाते.
वाचा: हिरो-हिरोईनच्याही तोंडाला येतो वास, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे असे होते? जाणून घ्या
गाव कसे बनले इतके श्रीमंत?
माधापारमधील अनेक कुटुंबे व्यवसाय आणि रोजगारासाठी परदेशात स्थायिक झाली आहेत. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, आफ्रिका आणि आखाती देशांमध्ये त्यांचे व्यवसाय यशस्वीपणे चालतात. पण हे प्रवासी भारतीय आपले गाव विसरले नाही. ते दरमहा आपल्या कुटुंबांना मोठ्या रकमा पाठवतात आणि गावाच्या विकासातही महत्त्वपूर्ण योगदान देतात. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कार्यांसाठी ते मोठ्या प्रमाणात मदत करतात. गावाला आधुनिक बनवण्यात या लोकांचा मोठा वाटा आहे.
12व्या शतकात स्थापन झालेले गाव
माधापार गाव 12व्या शतकात स्थापन झाले. म्हणजेच या गावाला 800 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. कच्छच्या मिस्त्री समुदायाने या गावाची पायाभरणी केली. या समुदायाने केवळ गुजरातमध्येच नव्हे, तर संपूर्ण भारतात अनेक नक्षीकाम असलेली मंदिरे आणि ऐतिहासिक इमारती बांधल्या. कालांतराने या गावात पंजाबी, गुजराती, बंगाली, तमिळ, मराठी, काश्मिरी अशा विविध समुदायांचे लोक एकत्र आले. आज हे गाव वैविध्यपूर्ण संस्कृतीचे प्रतीक आहे.
शहरांपेक्षाही उत्कृष्ट सुविधा
माधापारमध्ये शाळा, महाविद्यालये, बँका, आरोग्य केंद्रे, उद्याने, रस्ते आणि अशा सुविधा आहेत, ज्या कोणत्याही मोठ्या शहराला लाजवतील. या गावातील रहिवाशांचे जीवनशैली आणि सुविधा शहरांपेक्षाही बऱ्याच बाबतीत उत्कृष्ट आहेत. यामुळे भारताची खरी ताकद गावांमध्ये आहे, हा संदेश ते देत आहेत.