देवीच्या दर्शनाला गेला आणि नशीब फळफळलं… रस्त्यावरचा चमकणारा दगड आणला घरी अन् रातोरात..
मध्यप्रदेशातील गोविंद सिंह या आदिवासी मजुराला खेर मातेच्या दर्शनानंतर घरी परतताना रस्त्यात 4.04 कॅरेटचा मौल्यवान हिरा सापडला. या अनपेक्षित शोधामुळे त्याचे नशीब उजळले असून तो रातोरात करोडपती झाला आहे. लिलावातून मिळालेल्या पैशातून तो अर्धवट घर पूर्ण करणार आहे आणि नवीन ट्रॅक्टर घेण्याची त्याची योजना आहे. पन्ना जिल्ह्यातील या घटनेने नशिबावर विश्वास पुन्हा एकदा दृढ केला आहे.

कधी कुणाचं नशीब उघडेल याचा काही नेम नाही. मग तुम्ही श्रीमंत असा की गरीब. कोणत्याही जाती धर्माचे असा की पंथाचे. नशिबासमोर सर्व सारखे असतात. फक्त तुमच्या दैवात श्रीमंतीचा योग हवा. तुमच्या दैवात योग असेल तर तुम्हाला कोणीही श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही. एका आदिवासी मजुराच्या बाबतही असच काहीसं घडलंय. देवीच्या दर्शनानंतर हा आदिवासी मजूर घराकडे निघाला होता. रस्त्यात त्याला एक चमकणारा दगड सापडला. त्याने तो घरी नेला आणि रातोरात करोडपती झाला. काय होतं त्याला सापडलेलं? अचानक हा मजूर कसा झाला श्रीमंत?
गोविंद सिंह असं या 59 वर्षीय आदिवासी व्यक्तीचं नाव आहे. तो मध्यप्रदेशातील रहुंनिया गर्जर येथील रहिवासी आहे. रोजच्या प्रमाणे तो सकाळी खेर मातेच्या दर्शनासाठी मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तो परतत असताना त्याला रस्त्याच्या बाजूला काही तरी चमकत असल्याचं दिसलं. त्याने उत्सुकतेने तो दगड उचलला. हा दगड घरी घेऊन गेला. घरच्यांना दाखवल्यानंतर तो काही साधासुधा दगड नसून हिरा असल्याचं आढळलं. एक दोन नव्हे तर 4.04 कॅरेटचा जेम क्वॉलिटीचा हा हिरा होता.
लिलावातून मिळणार रक्कम
गोविंद तात्काळ हा हिरा घेऊन हिरा कार्यालयात गेला. तिथे त्याने हिरा तपासून पाहिला. तेव्हा तो हिराच असल्याचं समजलं. हिरे पारखी अनुपम सिंह यांनी या हिऱ्याची तपासणी केली. हा एक जेम क्वॉलिटीचा हिरा आहे. मार्केटमध्ये या हिऱ्याची चांगली डिमांड आहे, असं अनुपम सिंह म्हणाले. हा हिरा आता लिलावात काढला जाईल. लिलावातून मिळणाऱ्या सर्वाधिक बोलीतील 11.5 टक्के रक्कम रॉयल्टी म्हणून कापली जाईल. आणि उरलेली रक्कम या मजुराच्या खात्यात जमा केली जाईल, असं अनुपम सिंह म्हणाले.
घर बांधेन अन् ट्रॅक्टर घेईन
हिरा सापडल्यानंतर गोविंद सिंह आणि त्याच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. मजुरी आणि शेती करणाऱ्या या कुटुंबाला तर नशिबाने आपल्याला एक चांगली संधी दिलीय असं वाटतंय. हिरा सापडल्यानंतर गोविंदनेही प्रतिक्रिया दिलीय. तो म्हणतो, मी गेल्या तीन वर्षापासून माता राणीचं दर्शन घ्यायला नियमित जातो. माझ्याकडे ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरद्वारे शेती करतो. आता हिऱ्याचे पैसे आल्यानंतर मी माझं अर्धवट घर बांधेन आणि पैसे वाचले तर नवीन ट्रॅक्टरही खरेदी करेल.
उत्सुकतेपोटी दगड उचलला
मी नेहमीप्रमाणे माता राणीच्या दर्शनला गेलो होतो. परत येताना मला रस्त्यात चमकणारा दगड सापडला. मी उत्सुकता म्हणून तो उचलला. घरच्यांना दाखवल्यानंतर तो हिरा असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर मी हिरा कार्यालयात जाऊन खातरजमा केली, असं त्याने सांगितलं. मध्यप्रदेशातील पन्ना जिल्हा हा हिरे आणि खाणीसाठी प्रसिद्ध आहे. पण ही घटना या मजुरासाठी एका स्वप्नासारखी आहे. रस्त्याच्या कडेला सापडलेल्या एका वस्तूने त्याचं आयुष्य बदललं.
