Vande Bharat Express : वंदे भारतच्या जेवणात वड्यासोबत मिळाला लोखंडी बोल्ट! प्रवाशाचा संताप, व्हिडिओ केला शेअर
वंदे भारत मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या जेवणात असा काही प्रकार घडला आहे. की तो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. जेवणात दिलेल्या वड्यामध्ये चक्क लोखंडाचा मोठा बोल्ट आढळला. या घटनेचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला आहे

वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करताना प्रवाशांना चांगल्या सुविधा आणि दर्जेदार जेवण मिळेल अशी अपेक्षा असते. मात्र एका प्रवाशाच्या जेवणात असा काही प्रकार घडला आहे की तो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. जेवणात दिलेल्या वड्यामध्ये चक्क लोखंडाचा मोठा बोल्ट आढळला. या घटनेचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, प्रवाशाच्या तक्रारीनंतर इंडियन रेल्वेने म्हणजेच IRCTC ने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
ही घटना बंगळूरू ते बेळगावी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमधील आहे. एका प्रवाशाने जेवणात वडा मागवला. वडा तोंडात घालताच त्याच्या तोंडाला कडक वस्तू लागली. तपासून पाहिल्यानंतर लोखंडाची मोठी बोल्ट असल्याचं लक्षात आलंय. यानंतर त्यांनी त्या जेवणाचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. वंदे भारतच्या जेवणात अशा प्रकारे लोखंडी वस्तू सापडणं ही अन्नाच्या गुणवत्तेतील मोठी चूक असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच रेल्वे प्रशासनाला टॅग करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
A large bolt found in Vada in the Vande Bharath meal while travelling from Bengaluru to Belagavi today. This is a huge lapse in food quality. Please look into this matter @RailMinIndia @RailwaySeva @RailMadad @IRCTCofficial @railcomplaint #IndianRailways #VandeBharat https://t.co/VQxoUhtXIv
— samarth kodial (@SamKodial) November 27, 2026
IRCTC ने काय कारवाई केली
प्रवाशाची पोस्ट समोर आल्यानंतर IRCTC ने त्यावर प्रतिक्रिया दिली. प्रवाशाला झालेल्या गैरसोयीबद्दल संस्थेने दिलगिरी व्यक्त केली. तसेच या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित सेवा पुरवठादाराविरोधात कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचं स्पष्ट केलं.
सोशल मीडियावर घटनेची चर्चा
प्रवाशाने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरही या प्रकाराची चर्चा सुरू झाली. काहींनी या घटनेवर उपरोधिक प्रतिक्रिया दिल्या. तर अनेकांनी रेल्वेतील जेवणाच्या स्वच्छतेवर आणि गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले .
वंदे भारतसारख्या प्रिमियम ट्रेनमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये अशी वस्तू आढळल्याने अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी नेमकी कशी केली जाते. असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान IRCTC ने कारवाईची माहिती दिली असली तरी लोखंड वड्यासोबत कसा आला. याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
