Viral: 3,000 लोकांना रोज फ्री नूडल्स! रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा; स्थानिक व्यावसायिक चिंतेत
एका शहरात एक रेस्टॉरंट दररोज सुमारे 3,000 लोकांना मोफत नूडल्स देत आहे. येथे श्रीमंत आणि गरीब असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला अन्न दिले जाते. पण यामुळे स्थानिक दुकानदार मात्र चिंतेत आहेत.

चीनमधील एका रेस्टॉरंटने आपल्या अनोख्या उपक्रमामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या रेस्टॉरंटमध्ये दररोज हजारो लोकांना कोणतेही पैसे न घेता नूडल्स खाऊ घातले जातात. विशेष म्हणजे, येथे येणाऱ्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती काय आहे, तो श्रीमंत आहे की गरीब, याची कोणतीही चौकशी केली जात नाही. प्रत्येकाला मोफत जेवण दिले जाते. या उपक्रमाचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत असले, तरी दुसरीकडे परिसरातील छोट्या हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. मोफत जेवणामुळे ग्राहक आपल्या दुकानांकडे पाठ फिरवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दररोज 3 हजार लोकांना मोफत नूडल्स!
चीनमधील जियांग्सू प्रांतातील नानजिंग शहरात हे अनोखे रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे. ‘झिरो युआन नूडल रेस्टॉरंट’ असे त्याचे नाव असून, शहरात याच्या दोन शाखा आहेत. एक शाखा जियांगनिंग, तर दुसरी युहुआताई जिल्ह्यात आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला नूडल्सची एक प्लेट मोफत दिली जाते. त्यासाठी कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. एखादी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असो किंवा तिला पैशांची अडचण असो, सर्वांना समान वागणूक दिली जाते.
या नूडल्समध्ये मशरूम, सोयापासून तयार केलेले पदार्थ आणि विविध भाज्यांचा समावेश असतो. या उपक्रमाची माहिती पसरल्यानंतर रेस्टॉरंटबाहेर खाण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागायला सुरुवात झाली.
दिवसातून दोन वेळा होते मोफत जेवणाची व्यवस्था!
या रेस्टॉरंटमध्ये दररोज दोन वेळा नूडल्सचे वाटप केले जाते. सकाळी 11 ते दुपारी 12.30 आणि संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत लोकांना मोफत जेवण मिळते. दोन्ही शाखांमधून मिळून दररोज जवळपास ३ हजार नूडल्सचे बाऊल वितरित केले जातात. रेस्टॉरंटचे मालक झांग यांनी हा उपक्रम सुरू करण्यामागे गरजू लोकांना जेवण उपलब्ध करून देणे हाच उद्देश असल्याचे सांगितले आहे. या उपक्रमाचा संपूर्ण खर्च ते स्वतः उचलतात. यातून कोणताही आर्थिक फायदा मिळवण्याचा त्यांचा हेतू नाही. भविष्यात दररोज 3३ हजारांवरून 5५ हजार लोकांना मोफत नूडल्स देण्याचा त्यांचा विचार आहे.
रेस्टॉरंटमध्ये एक संदेशही लावण्यात आला आहे. ज्यांना जेवणाचे पैसे देणे सहज शक्य आहे, त्यांनी मोफत जेवणाचा लाभ न घेता खरोखर गरजू व्यक्तीसाठी ते उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन या संदेशातून करण्यात आले आहे.
मोफत जेवणामुळे छोट्या हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान?
एका बाजूला या उपक्रमाचे कौतुक होत असताना दुसऱ्या बाजूला स्थानिक व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाजारपेठेत मोफत नूडल्स मिळत असल्याने लोक पैसे देऊन जेवण घेण्याऐवजी या रेस्टॉरंटकडे वळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एका स्थानिक दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी त्याच्या रेस्टॉरंटमध्ये दररोज 2 हजार ते 3 हजार युआनची उलाढाल होत होती. मात्र, मोफत नूडल्सचा उपक्रम सुरू झाल्यानंतर ही कमाई काहीशे युआनपर्यंत घसरली आहे. तर, ली फांग नावाच्या आणखी एका नूडल्स रेस्टॉरंटच्या मालकिणीने गेल्या एका महिन्यात व्यवसायात जवळपास 30 टक्क्यांची घट झाल्याचे सांगितले. परिस्थिती अशीच राहिली, तर दुकान दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची वेळ येऊ शकते, अशी भीतीही काही दुकानदारांनी व्यक्त केली आहे.
गरजू लोकांना मदत करण्याच्या उपक्रमाला आपला विरोध नाही. मात्र, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे आधीच मर्यादित उत्पन्नावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या दुकानदारांचे नुकसान होता कामा नये, अशी त्यांची भूमिका आहे. काही दुकानदारांनी रुग्णालये, शाळा आणि अनाथाश्रम अशा ठिकाणी मोफत अन्नवाटप करण्याचा पर्याय सुचवला आहे.
मात्र, सर्वच दुकानदार या नुकसानीसाठी मोफत नूडल्सच्या उपक्रमाला जबाबदार धरत नाहीत. परिसरातील काही कारखाने दुसरीकडे स्थलांतरित झाल्यामुळेही बाजारपेठेतील ग्राहकांची संख्या कमी झाली आहे, असे काहींचे म्हणणे आहे.
प्रशासनाकडून चौकशी; नियमांचे उल्लंघन नाही
या रेस्टॉरंटविषयी स्थानिक पातळीवर तक्रारी वाढल्यानंतर प्रशासनानेही या प्रकरणाची दखल घेत चौकशी केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासणीत रेस्टॉरंटकडे आवश्यक परवाने असल्याचे आढळले. तसेच स्वच्छतेच्या बाबतीतही कोणतीही गंभीर त्रुटी दिसून आली नाही.
अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता यावर प्रशासन लक्ष ठेवणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. मोफत जेवण वाटपाचा हा उपक्रम बेकायदेशीर असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आलेले नाही. सोशल मीडियावर या रेस्टॉरंटविषयी करण्यात आलेल्या काही आरोपांचीही तपासणी करण्यात आली.
एकीकडे हजारो लोकांची भूक भागवणारा हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरत आहे, तर दुसरीकडे त्याच उपक्रमामुळे स्थानिक छोट्या व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे राहत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे गरजूंना मदत आणि स्थानिक व्यवसायांचे हित या दोन्ही गोष्टींचा समतोल कसा साधायचा, हा प्रश्न आता चर्चेत आला आहे.