
उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील नौतनवा क्षेत्रातील एक लग्न सध्या पंचक्रोशीतच नाही तर सोशल मीडियावर सुद्धा गाजत आहे. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. नवीन जीवनाची सुरुवात या सोहळ्यातून होते. आपल्याकडे लग्नाची एक मोठी धामधूम असते. पाहुणे, आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या साक्षीने हा सोहळा रंगतो. या गोष्टीत मात्र अघटित झाले.
या लग्नाची तारीख ठरली होती. त्या दिवशी मंडप सजला होता. पाहुण्यांची एकच गर्दी उसळली होती. धामधूम सुरू होती. सर्व तयारी झाली होती. लग्न घटिका जसजशी जवळ येत होती. तसतसे नवरदेव किती दूर आहे, याची माहिती घेण्यात येत होती. आपल्या पतीसाठी वधूने सोळा श्रृंगार केला होता. ती भावी आयुष्याची स्वप्न रंगवत नवरदेवाची वाट पाहत होती. पण त्याचवेळी ती बातमी येऊन धडकली आणि पिपाणीचे सूर बदलले.
काय होती ती अप्रिय घटना
वर्हाडी मंडळी वरात निघण्याची वाट पाहत होते. लग्न वेळेत लागावे यासाठी वधू पक्षाचा आग्रह होता. त्यांनी वरात निघाली की नाही म्हणून चौकशी केली, त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला. नवरदेव त्याच्या प्रेयसीसह फरार झाल्याची वार्ता वधू पक्षाच्या कानावर येऊन धडकली. ही वार्ता अवघ्या काही मिनिटात वधू आणि तिच्या आईच्या कानावर येऊन आदळली. दोघींना चक्कर आले. ते बेशुद्ध झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मंगलकार्य सुरू असलेल्या घरात अचानक दु:खाचे सावट आले.
ही घटना नौतनवा परिसरातील एका गावातील आहे. या घरात गेल्या काही महिन्यांपासून लग्नाची तयारी सुरू होती. घरात आनंदाचं वातावरण होतं. काही दिवसांपासून वधू पक्षातील दूरचे नातेवाईक, तिच्या मैत्रिणी आल्या होत्या. घरात गडबड सुरू होती. दोन दिवसांपासून तर लग्नीनघाई सुरू होती. वाजंत्री, पाहुणे यांचा कल्लोळ होता. लग्नाच्या दिवशी सकाळपासूनच वधू , नवरदेव केव्हा वरात घेऊन येणार याची वाट पाहत होती. तितक्यात वराच्या आईने फोन करून वधू पक्षाला हकिकत सांगितली आणि सर्वांनाच धक्का बसला.
वधू आणि तिची आई रुग्णालयात
नवरदेव दुसर्याच मुलीसोबत पळून गेल्याचे समोर आल्याची वार्ता येऊन धडकताच वधू आणि तिच्या आईची शुद्ध हरपली. दोघींना जबरदस्त धक्का बसला. मानसिक आघात झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. आता दोघींची तब्येत ठीक असल्याचे समोर येत आहे. नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियावर संताप व्यक्त होत आहे. लग्न करायचे नव्हते तर नवरदेवाने अगोदरच नकार कळवायचा होता, असा वेळेवर धोका देऊन त्याने काय साधले असा संतप्त सवाल मुलीच्या आईने केला. या लग्नासाठी वधू पक्षाने लाखोंचा खर्च केला. तोही पाण्यात गेला.