Cockroach Janta Party : देशात आणखी एका पक्षाची एन्ट्री? मराठी मुलाने सुरु केलेली कॉकरोच जनता पार्टी काय आहे?
Cockroach Janta Party : सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी'ने धुमाकूळ घातला आहे. या पार्टीने भाजप-काँग्रेसला मागे टाकत ५ दिवसांत १० दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. काय आहे नेमके प्रकरण?

सध्या देशभरात ‘कॉकरोच जनता पार्टी’ची (Cockroach Janta Party – CJP) सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सुरुवातीला लोकांनी याला निव्वळ एक गंमत किंवा ‘मीम‘ समजले होते, परंतु अवघ्या ५ दिवसांत या पार्टीने इन्स्टाग्रामवर १ कोटी (10M) फॉलोअर्सचा टप्पा पार करून इतिहास रचला आहे. फॉलोअर्सच्या शर्यतीत या डिजिटल पार्टीने भारतीय जनता पार्टीला (BJP) मागे टाकले असून, लवकरच ती काँग्रेसलाही मागे टाकण्याच्या तयारीत आहे. एका विधानावरून सुरू झालेली ही चळवळ आता सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे. अनेकांना ‘कॉकरोच जनता पार्टी’ नाव वाचून देशात नवा पक्ष आला की काय? असा प्रश्न पडला आहे.
कॉकरोच जनता पार्टी काय आहे?
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका विधानामुळे झाली. एका सुनावणीदरम्यान बोलताना, “काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे (Cockroaches) व्यवस्थेवर हल्ला करतात. ते कायदा, प्रसारमाध्यमे आणि आरटीआय (RTI) चळवळीसारख्या यंत्रणांमध्ये घुसखोरी करत आहेत,” अशी टिप्पणी त्यांनी केली होती. या विधानानंतर तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. “हे विधान सामान्य बेरोजगार तरुणांसाठी नसून बनावट पदव्या घेणाऱ्यांसाठी होते,” असे स्पष्टीकरण नंतर सरन्यायाधीशांनी दिले; परंतु तोपर्यंत सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक झाला होता.
मराठमोळ्या तरुणाने अमेरिकेतून उभारली ‘डिजिटल चळवळ’
तरुणांचा अपमान झाल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी एक अनोखी चळवळ उभी राहिली. मूळचे छत्रपती संभाजीनगरचे असणारे आणि सध्या अमेरिकेतील बोस्टन येथे पदव्युत्तर (Post-Graduation) शिक्षण घेणारे अभिजीत दीपके यांनी या संतापाला एक डिजिटल रूप दिले. त्यांनी बोस्टनमध्ये बसूनच ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने एक वेबसाईट, इन्स्टाग्राम हँडल आणि एक्स (ट्विटर) खाते सुरू केले. बघता बघता देशातील लाखो तरुण या मोहिमेत सामील झाले.
कोण आहेत अभिजीत दीपके?
वय: ३० वर्षे
मूळ रहिवासी: छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र.
सध्याचे स्थान: बोस्टन, अमेरिका (उच्च शिक्षण घेत आहेत).
पार्श्वभूमी: यापूर्वी त्यांनी ‘आम आदमी पार्टी’चे (AAP) सोशल मीडिया हँडल सांभाळले आहे.
सध्याची भूमिका: कॉकरोच जनता पार्टीचे ‘संस्थापक आणि मुख्य समन्वयक’.
“सरन्यायाधीशांचे वक्तव्य तर फक्त एक निमित्त होते. तरुणांच्या मनात अनेक वर्षांपासून साचलेला राग या माध्यमातून बाहेर आला आहे. आजच्या नव्या पिढीला हिंदू-मुस्लिम किंवा जातीपातीचे राजकारण नको आहे. आम्हाला दर्जेदार शिक्षण, रोजगार आणि नवनवीन तंत्रज्ञान हवे आहे” असे अभिजीत दीपके (संस्थापक, CJP) यांचे म्हणणे आहे.
तरुणांच्या ताकदीचा प्रत्यय
भारतासारख्या तरुण देशात जर तरुणांच्याच परिस्थितीची थट्टा उडवली, तर काय घडू शकते याचे ‘कॉकरोच जनता पार्टी’ हे जिवंत उदाहरण बनले आहे. केवळ ५ दिवसांत मिळालेला हा अफाट प्रतिसाद देशातील तरुणांच्या बेरोजगारीच्या समस्येकडे आणि त्यांच्यातील असंतोषाकडे लक्ष वेधणारा ठरला आहे.