कामाचा इतका लोड की कर्मचाऱ्याने बाइकवरच लॅपटॉप ठेवून सुरु केलं काम, Video पाहून सर्वच थक्क
वर्क फ्रॉम होमनंतर आता सोशल मीडियावर वर्क फ्रॉम बाइकची जोरदार चर्चा. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओने सर्वच थक्क. तर अनेकांनी उपस्थित केले प्रश्न.

Viral Video : आजच्या डिजिटल युगात ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना सर्वसामान्य झाली आहे. अनेक कर्मचारी घरातून काम करताना दिसतात तर काही जण बस, रेल्वे किंवा मेट्रो प्रवासादरम्यानही लॅपटॉपवर काम करताना आढळतात. मात्र, अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चालत्या मोटारसायकलवर लॅपटॉप उघडून काम करताना दिसत असून या प्रकाराला नेटकऱ्यांनी ‘वर्क फ्रॉम बाइक’ असे नाव दिले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती मोटारसायकल चालवत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्याच्या एका हातात वाहनाचे नियंत्रण असून, समोर मोटारसायकलच्या टाकीवर लॅपटॉप ओपन करून ठेवलेला दिसत आहे. विशेष म्हणजे, तो रस्त्याकडे लक्ष देण्याऐवजी लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहत असल्याचे दिसून येते. आसपास इतर वाहने, वाहतुकीची गर्दी आणि रस्त्यावरील गोंधळ असतानाही ही व्यक्ती कामात व्यस्त असल्याचे पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला.
हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने त्यासोबत भावनिक संदेशही लिहिला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, रस्त्यावर असे सीन पाहिले की अक्षरशः अंगावर शहारे आले. लोक कामाच्या ओझ्याखाली इतके दबले आहेत की आयुष्य पुन्हा मिळत नाही हे विसरत आहेत. काही मिनिटांचे काम तुमच्या जीवापेक्षा अधिक मौल्यवान असू शकते का? सुरक्षितपणे घरी पोहोचलात तरच करिअरचा उपयोग होईल असं त्याने म्हटलं आहे.
सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली तर काहींनी संबंधित व्यक्तीबद्दल चिंता व्यक्त केली. एका नेटकऱ्याने लिहिले, जर नोकरीचा ताण इतका वाढला असेल तर अशी नोकरी सोडून द्यावी. एवढा मोठा धोका घेण्याची गरज नाही. तुमचे कुटुंब तुमची वाट पाहत आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिलं की, काम महत्त्वाचे असते पण ते आयुष्यापेक्षा मोठे नाही. बाइक चालवताना लॅपटॉप उघडण्याची गरजच काय?
सड़क पर एक ऐसा नज़ारा देखा जिसे देखकर रोंगटे खड़े हो गए।
लोग वर्कहोलिक होने के चक्कर में ये भूल रहे हैं कि जिंदगी दोबारा नहीं मिलेगी।
क्या कुछ मिनटों का काम, आपकी जान से ज्यादा कीमती है? अगर सुरक्षित घर पहुंच गए, तभी तो करियर काम आएगा। pic.twitter.com/ftPRQf3ORo
— Indrajeet Nishad (@NishadIndra1) June 12, 2026
कॉर्पोरेट संस्कृतीवरही प्रश्नचिन्ह
काही नेटकऱ्यांनी या घटनेचा संबंध थेट वाढत्या कॉर्पोरेट दबावाशी जोडला. एका व्यक्तीने टिप्पणी करताना म्हटले, आजच्या कॉर्पोरेट क्षेत्रात कामाचा ताण इतका वाढला आहे की लोकांना मृत्यूचीही भीती वाटेनाशी झाली आहे. कारण ते दररोज कामाच्या तणावाखाली मानसिकदृष्ट्या थकून जात आहेत.
या प्रतिक्रियांमधून आधुनिक कामकाजाच्या संस्कृतीतील वाढता ताण, सतत उपलब्ध राहण्याची अपेक्षा आणि काम-जीवन संतुलनाचा अभाव याविषयीची चिंता स्पष्टपणे दिसून येते.