
आजच्या डिजीटल युगात बँकिंग व्यवहार ऑनलाईन करणे अधिक सोपे झाले आहेत. मोबाईल अॅप्स, नेटबँकिंग आणि एटीएमच्या माध्यमातून बहुतांश कामं घरबसल्या काही सेकंदांत होतात आणि यामुळे वेळ देखील वाचतो. पण काही कामं अजूनही अशी आहेत की, जी पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष बँकेतच जावं लागतं – जसं की KYC अपडेट करणं, पासबुक प्रिंट करणं, डिमांड ड्राफ्ट (DD) बनवणं, चेकबुकसाठी अर्ज करणं किंवा खात्याशी संबंधित काही अधिकृत कागदपत्रं द्यावीत/घ्यावीत लागणं.
पण अनेक वेळा ग्राहकांच्या अनुभवातून हे समोर आलं आहे की, काही बँक कर्मचारी मुद्दाम वेळकाढूपणा करतात. ग्राहकांना फोल स्पष्टीकरणं देतात किंवा सरळ दुर्लक्ष करतात. एखादं काम जे ५-१० मिनिटांत होऊ शकतं, ते तासन्तास, कधी कधी दिवसन्दिवस लांबवलं जातं. अशा प्रकारांना थांबवण्यासाठी तुमच्याकडे कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत.
1. शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार करा
सर्वप्रथम, संबंधित शाखेतील व्यवस्थापकाशी थेट संपर्क करा. त्यांना प्रत्यक्ष भेटा किंवा फोन/ईमेलद्वारे तुमची समस्या समजावून सांगा. अनेकदा तिथेच मुद्दा सुटतो.
2. टोल-फ्री हेल्पलाइनवर कॉल करा
बँकेचा अधिकृत टोल-फ्री क्रमांक पासबुकवर किंवा बँकेच्या वेबसाईटवर असतो. त्या नंबरवर कॉल करून ग्राहक सेवा प्रतिनिधीशी बोला आणि तुमची तक्रार नोंदवा.
3. RBI च्या तक्रार पोर्टलवर जा
जर बँकेकडून योग्य प्रतिसाद मिळत नसेल, तर तुम्ही RBI च्या अधिकृत ग्राहक तक्रार पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदवताना तुमच्याकडे असलेले व्यवहाराचे पुरावे, शाखेचे नाव आणि कर्मचाऱ्याचं नाव (असेल तर) ही माहिती तयार ठेवा.
4. लिखित तक्रार आणि बँकिंग लोकपाल
जर प्रकरण गंभीर असेल, तर बँकेला लेखी तक्रार द्या. बँकेकडून उत्तर आलं आणि ते समाधानकारक नसेल, तर तुम्ही RBI च्या बँकिंग लोकपाल कार्यालयाशी संपर्क साधू शकता. लोकपाल ही एक स्वतंत्र संस्था आहे जी ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करतं.
ग्राहक म्हणून तुमच्याकडे चांगल्या सेवेचा पूर्ण अधिकार आहे. जर कोणताही बँकेचा कर्मचारी तुमचं काम टाळत असेल, उशीर करत असेल किंवा विनाकारण वेळ वाया घालवत असेल, तर तुम्ही गप्प बसू नका. योग्य ती पावलं उचला आणि तुमच्या हक्कासाठी आवाज उठवा. कारण चांगली सेवा ही तुमची गरज नाही – ती तुमचा अधिकार आहे.
तसेच, तुम्ही भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडेही बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला https://cms.rbi.org.in/cms/indexpage.html#eng या लिंकवर जाऊन तक्रार नोंदवता येते.