
एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला कौटुंबिक पेन्शन मिळते, पण जर एखाद्या व्यक्तीने दुसरे लग्न केले असेल तर दुसऱ्या पत्नीला किंवा ‘सावत्र आई’ला ही पेन्शन मिळते का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने यावर एक महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. न्यायालयाने ‘आई’ या शब्दाची व्याख्या अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. यामुळे सामाजिक कल्याण योजनांमध्ये सावत्र आईचाही समावेश केला जाऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.
दुसऱ्या पत्नीचा पतीच्या मालमत्तेवर अधिकार
सध्याच्या नियमांनुसार, जर एखादी व्यक्ती सरकारी नोकरीत असेल आणि तिचा मृत्यू झाल्यास, तिची दुसरी पत्नी अनुकंपावर नोकरी किंवा कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र नसते. मात्र, तिच्या मुलांना हे सर्व लाभ मिळतात. मुलांच्या बाबतीत, मुलगा सज्ञान होईपर्यंत आणि मुलगी लग्न होईपर्यंत पेन्शनसाठी पात्र असते.
महत्त्वाचा नियम: जर पहिल्या पत्नीच्या हयातीत पतीने दुसरे लग्न केले असेल, तर दुसऱ्या पत्नीला कौटुंबिक पेन्शन मिळत नाही, जरी त्यांचे लग्न कायदेशीर असले तरी.
दुसऱ्या पत्नीला कधी मिळतो कायदेशीर हक्क?
हिंदू विवाह कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केले असेल, तर दुसऱ्या पत्नीला कायदेशीर हक्क मिळतात. या परिस्थितीत, दुसऱ्या पत्नीला पतीच्या सर्व मालमत्तेवर हक्क मिळतो आणि तिला कौटुंबिक पेन्शनही मिळू शकते.
घटस्फोट झाल्यास: हीच परिस्थिती घटस्फोटानंतरही लागू होते. जर पतीने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर दुसरे लग्न केले असेल, तर दुसऱ्या पत्नीला ते सर्व अधिकार मिळतात जे एका पत्नीला मिळतात.
आईच्या व्याख्येवर सर्वोच्च न्यायालयाचे भाष्य
अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात एका महिलेने याचिका दाखल केली होती. या महिलेने तिच्या पतीच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांचे पालनपोषण केले होते. ती कौटुंबिक पेन्शनची मागणी करत होती. तेव्हा न्यायमूर्ती कांत यांनी केंद्र सरकारच्या वकिलाला प्रश्न विचारला की, ‘जर एका महिन्याच्या बाळाच्या आईचे निधन झाले आणि वडिलांनी दुसरे लग्न केले, तर सावत्र आईला खरी आई मानले जाणार नाही का?’
न्यायमूर्ती कांत यांनी स्पष्ट केले की, कायद्याने जरी तुम्ही तिला सावत्र आई म्हणत असाल, तरी तिने पहिल्या दिवसापासून त्या मुलासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे, त्यामुळे ती आईच आहे. त्यामुळे सामाजिक कल्याण योजनांचा लाभ देण्यासाठी ‘आई’ या शब्दाची व्याख्या उदार आणि लवचिक (Flexible) असणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.