
भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) महिला गुंतवणूकदारांची (Women Investors) संख्या खूप वेगाने वाढत आहे, ही एक सकारात्मक गोष्ट आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या एका रिपोर्टनुसार, जून 2025 पर्यंतच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, महिलांचा शेअर बाजारातील सहभाग वाढत आहे, तर दुसरीकडे 30 वर्षांखालील तरुण गुंतवणूकदारांचे प्रमाण कमी होत आहे. चला, जाणून घेऊया देशातील कोणत्या राज्यातील महिला शेअर बाजारात सर्वाधिक गुंतवणूक करत आहेत.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, शेअर बाजारात एकूण गुंतवणूकदार नोंदणीच्या बाबतीत पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्रातील महिला अव्वल आहेत.
महाराष्ट्र: महाराष्ट्रातील महिलांचा सहभाग जून 2025 मध्ये 28.4% पर्यंत वाढला आहे, जो आर्थिक वर्ष 2023 मध्ये 25.6% होता.
गुजरात: या यादीत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील महिला गुंतवणूकदारांचा सहभाग आर्थिक वर्ष 2023 मधील 26.6% वरून वाढून जून 2025 मध्ये 27.8% झाला आहे.
या उलट, उत्तर प्रदेशसारखं मोठं राज्य याबाबतीत मागे आहे. देशात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा गुंतवणूकदार आधार असूनही, उत्तर प्रदेशमध्ये महिलांचा सहभाग केवळ 18.7% आहे, जो राष्ट्रीय सरासरी 24.5% पेक्षा खूप कमी आहे.
आर्थिक वर्ष 2023 मध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त महिला गुंतवणूकदार असलेले राज्ये फक्त 44% होती, पण आता अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये ही संख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. या रिपोर्टमध्ये छोट्या राज्यांनी लैंगिक समावेशात (Gender Inclusion) चांगली कामगिरी केली आहे, असेही दिसून आले आहे.
गोवा: गोवा या यादीत सर्वात पुढे आहे.
मिझोरम: गोवा नंतर मिझोरमचा नंबर लागतो.
याशिवाय, चंदीगड (32%), दिल्ली (30.5%) आणि सिक्कीम (30.3%) येथेही महिला गुंतवणूकदारांची संख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. ही आकडेवारी दर्शवते की, महिला आर्थिक निर्णयांमध्ये अधिक सक्रियपणे सहभागी होत आहेत.