Term Insurance : टर्म इन्शुरन्सचा होईल अधिक फायदा, खरेदीपूर्वी हे पाईंट्स लक्षात ठेवा

| Updated on: Mar 02, 2023 | 6:24 PM

Term Insurance : ज्या व्यक्तींवर आर्थिक जबाबदारी अधिक असते. त्यांनी टर्म इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञही अशा लोकांना टर्म इन्शुरन्स खरेदी करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे व्यक्तीच्या कुटुंबाला मोठा आर्थिक हातभार लागतो. 

Term Insurance : टर्म इन्शुरन्सचा होईल अधिक फायदा, खरेदीपूर्वी हे पाईंट्स लक्षात ठेवा
Follow us on

नवी दिल्ली : भारतीयांचा विम्याकडे (Insurance) पाहण्याचा दृष्टिकोन अद्यापही बदललेला नाही. विमा अद्यापही चैनीची वस्तू असल्याचा भ्रम कायम आहे. अनेक जण उत्साहाने विमा काढतात. पण त्यांना त्यातून अधिक परतावा हवा असतो. तो मिळत नसल्याचे लक्षात आले की, विमाधारक हप्ता (Insurance Premium) भरणे बंद करतात. विमा आणि गुंतवणूक एकच असल्याचा भ्रम अद्यापही समाजात कायम आहे. विमा कंपन्या याच भ्रमाचा फायदा उठविण्याचा प्रयत्न करतात. विमा एजन्ट योग्य माहिती देत नाही वा अपूरी माहिती देतात. काही वर्षे हप्ते भरल्यानंतर ग्राहकांना त्याचा फायदा दिसत नाही. विमा पॉलिसी बंद होते. अशावेळी टर्म इन्शुरन्स (Term Insurance) हा फायद्याचा ठरतो. एका ठराविक कालावधीसाठी विम्याचे संरक्षण ग्राहकाला घेता येते. त्यामुळे त्याला वाटले तर तो ही पॉलिसी बंद करुन दुसरी पॉलिसी घेऊ शकतो. पण या योजनेत गुंतवणुकीवर परतावा मिळत नाही. पण विमाधारकाचा मृत्यू ओढावल्यास त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळते.

सध्या बाजारात विविध विमा योजनांचा पाऊस आहे. एक शोधा हजारो पर्याय मिळतात. तेव्हा टर्म इन्शुरन्स हा चांगला पर्याय आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने(IRDAI) भारतात विमा पॉलिसीविषयीची उदासीनता विषद केली आहे. 2019 च्या आकडेवारीनुसार भारतात विमाधारकांची संख्या अवघी 3.69% इतकीच आहे. पण कोरोनानंतर अर्थातच त्यात वाढ झाली. आरोग्य विमा आणी जीवन विमा, मुदत विमा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता हा मुदत विमा (Term Insurance) काय भानगड आहे ती? तर टर्म इन्शुरन्स हा जीवन विम्याचाच एक भाग आहे. एका विशिष्ट कालावधीसाठी या योजनेत विमाधारकाला विम्याचे संरक्षण देण्यात येते. विमाधारकाचे निधन झाल्यास, विम्याची रक्कम त्याच्या कुटुंबियांना देण्यात येते. टर्म इन्शुरन्सची मुदत संपल्यावर या पॉलिसीची तुम्हाला नुतनीकरण करता येते. पण त्यासाठी काही अटींचे पालन करावे लागते.

हे सुद्धा वाचा

पॉलिसीचे नूतनीकरण करताना व्यक्तीचे वय, लिंग, वैद्यकीय परिस्थिती हे तपासून विमाधारकाचा प्रीमियम ठरविण्यात येतो. त्याआधारे पॉलिसीचे नुतनीकरण करण्यात येते. गरज असेल तर विमाधारकाची वैद्यकीय तपासणी पण करण्यात येते. तसेच विमाधारकाची कौटुंबिक परिस्थिती, आरोग्य, विमाधारकाला एखादे व्यसन आहे का या माहितीचा ही पडताळा घेण्यात येतो.

हे पॉईंट्स ठेवा लक्षात

  1. 18 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत टर्म इन्शुरन्स खरेदी करता येतो
  2. पण तज्ज्ञ 20 ते 25 वयोगटातच टर्म इन्शुरन्स खरेदीचा सल्ला देतात
  3. तसेच पॉलिसी टर्म मोठी ठेवण्याचाही सल्ला देतात
  4. तुमच्या भविष्यातील गरजा पूर्ण होईल एवढा टर्म इन्शुरन्स खरेदी करावा
  5. तज्ज्ञांच्या मते 9 ते 10 पटीत परतावा मिळेल, इतका मुदत विमा खरेदी करावा
  6. मुदत विमा खरेदी करताना आजारांची माहिती लपवू नका
  7. आजारपण लपविल्यास मुदत विम्याचा दावा करताना तो फेटाळला जाऊ शकतो
  8. मुदत विमा खरेदी करताना संबंधित कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो तपासा
  9. मुदत विम्यात दावे फेटाळणाऱ्या विमा कंपनीची योजना खरेदी करु नका