31 जानेवारीनंतर बंद होणार हे FASTag, मनस्ताप टाळण्यासाठी करा हा उपाय

FASTag Update | आता तंत्रज्ञानात रोजरोज बदल होत आहे. टोल नाक्यावरील लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी फास्टटॅग हे तंत्रज्ञान आले. त्यातही अनेक बदल होत आहे. त्यातील घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. आता फास्टटॅग संदर्भात ही नवीन अपडेट समोर आली आहे.

31 जानेवारीनंतर बंद होणार हे FASTag, मनस्ताप टाळण्यासाठी करा हा उपाय
| Updated on: Jan 16, 2024 | 10:14 AM

नवी दिल्ली | 16 जानेवारी 2024 : फास्टटॅगविषयी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, 31 जानेवारीनंतर काही फास्टटॅग रद्द करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून तुम्ही टोल नाक्यावर टोल भरु शकत नाही. वाहनधारकांना एक वाहन, एक फास्टटॅगचा वापर करावा लागणार आहे. बँकांच्या माध्यमातून यापूर्वी घेतलेले फास्टटॅग दूर करावे लागतील, असे निर्देश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून याविषयीच्या काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आणि घोटाळे उघडकीस आल्यानंतर एनएचएआयने हा निर्णय घेतला आहे. तर ग्राहकांना नवीन घेतलेल्या फास्टटॅगसाठी केवायसी करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

तर दुप्पट टोल

विना फास्टटॅग वाहनांना टोल नाक्यावर दुप्पट कर मोजावा लागणार आहे. एनएचएआयने काही शंका असल्यास नजीकच्या टोल नाक्यावर याविषयीची माहिती घेण्याचा अथवा बँकांच्या टोल-फ्री ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधण्याचे वाहनधारकांना आवाहन केले आहे. टोल नाक्यावर कुठल्याही अचडण, मनस्ताप टाळण्यासाठी वाहनधारकांना त्यांच्या आताच घेतलेल्या फास्टटॅगचे केवायसी करणे पण अनिवार्य करण्यात आले आहे. केवायसी अपडेट नसेल तर त्यांना फास्टटॅगचा वापर करता येणार नाही. त्यांचा फास्टटॅग आयडी अपडेट होणार नाही.

एनएचआयने का उचलले हे पाऊल

NHAI ने हे पाऊल आरबीआयच्या आदेशानंतर उचलले. एकाच वाहनासाठी अनेक फास्टटॅग विक्री केल्याचे लक्षात आले. तसेच विना केवायसी अनेक फास्टटॅग बाजारात आणल्याचा ठपका केंद्रीय बँकेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात ठेवला होता. त्यामुळेच आता एक वाहन, एक फास्टटॅग असे निर्देश एनएचआयएने दिले आहेत. त्यामुळे अनेक वाहनांसाठी एकच फास्टटॅगचा वापर आणि एका खास वाहनासाठी अनेक फास्टटॅगचा वापर बंद करण्यात येणार आहे. असे सर्व फास्टटॅग आता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आता मनस्ताप टाळण्यासाठी सर्वात अगोदर त्यांच्या फास्टटॅगची केवायसी करुन घ्यावी. तरच त्यांचे फास्टटॅग सक्रिय राहणार आहे. याविषयीचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत. त्यामुळे टोल प्लाझावर त्यांना दुप्पट टोल द्यावा लागणार नाही.

8 कोटी वाहन चालक करतात वापर

देशभरात 8 कोटी वाहन चालक फास्टटॅगचा वापर करतात. या नवीन इलेक्ट्रिक कर प्रणालीमुळे, कर संकलानाचा वेग तर वाढलाच आहे. पण त्यात सूसुत्रता पण आली आहे. पण त्यातही काही पळवाटा आणि घडबड होत असल्याची शंका आल्यानंतर आता नवीन निर्देश देण्यात आले आहे. काही दिवसांनी फास्टटॅगऐवजी वाहन क्रमांकाआधारेच कर संकलनाचे तंत्रज्ञान आणण्याचा मनोदय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी बोलून दाखवला आहे.