12th Board Exam : बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळून खाक, व्हिडीओ व्हायरल, नेमकं घडलं काय?
12 वी कॉमर्स च्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळाल्या. या उत्तरपत्रिका जळाल्याचा व्हिडीओ सध्या वसई विरार मधील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, शिक्षिकेच्या निष्काळजी पणा विरोधात विध्यार्थी आणि पालक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी नांदेडच्या एका एसटी बसमध्ये एक शिक्षक बारावी बोर्डाचे पेपर तपासत असतानाचा व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता मुंबईतील विरारमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरारमध्ये 12 वी बोर्डाच्या कॉमर्सच्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा जीव चांगलाच टांगणीला लागला आहे. शिक्षिकेच्या निष्काळजीपणा विरोधात विद्यार्थी आणि पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विरार पश्चिम येथील गंगुबाई अपार्टमेंटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 12 वीच्या कॉमर्सच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्याच घरी जळाल्या असल्याची माहिती समोर येत असून हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. ही घटना 10 तारखेला घडली असून शिक्षिकेच्या मुलाची दहावीची परीक्षा असल्याने त्या आपल्या मुलाला सोडायला गेल्या होत्या. त्यावेळी देवघरात असणारा बल्ब शॉर्टसर्कीट झाल्याने त्याचा स्पार्क सोफ्यावर उडाला आणि सोफ्यासह उत्तरपत्रिका देखील जळून खाक झाल्याची माहिती मिळतेय.