ठाकरेंच्या शिवसेनेतील कोकणातील ‘या’ 3 नेत्यांची हाकालपट्टी, एकनाथ शिंदेंचा ‘धनुष्यबाण’ हाती घेणार?
शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगरवर भाष्य करत टप्प्या-टप्प्यात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल, असा दावा केला होता. त्यातच आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील कोकणातल्या 3 नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगरवर भाष्य करत टप्प्या-टप्प्यात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल, असा दावा केला होता. नुकताच कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार आणि उद्धव ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक राजन साळवी यांनी शिवबंधन तोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. तर “उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक जण आमच्यासोबत येणार आहेत. त्यांचा आज प्रवेश होत आहे” असं उदय सामंत म्हणाले. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरीत आभार सभा होत आहे. रत्नागिरीच्या चंपक मैदानात ही सभा होणार असून त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील कोकणातल्या तीन नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, माजी आमदार सुभाष बने यांची हकालपट्टी करण्यात आली आहे तर यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र माजी आमदार सुभाष बने यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने हे दोघे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश कऱणार असल्याची माहिती समोर येत आहे.