Nishikant Dubey : …तरच तुम्ही बाळासाहेबांचे खरे वारस, पटक पटक के मारेंगे, भाजप खासदारांचं ठाकरेंना चॅलेंज
तुम्ही तुमच्याच घरात आहात. तुम्ही महाराष्ट्रात आहात. जर तुम्ही इतके मोठे साहेब असाल तर बिहारमध्ये या. उत्तर प्रदेशात या, आम्ही तुम्हाला मारहाण करू. आम्ही मराठीचा आदर करतो. मराठी ही एक आदरणीय भाषा आहे. आम्ही छत्रपती शाहूजी आणि शिवाजी महाराजांचा आदर करतो, असं म्हणत दुबेंची ठाकरेंना चॅलेंज दिलं.
मुंबईत मराठी बोलता न येणाऱ्या हिंदी भाषिकांना मारहाण केल्याचे प्रकरण आता राजकीय मुद्दा बनला आहे. या मुद्द्यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनसेला लक्ष्य केले जात आहेत. अशातच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे यांना बिहारमध्ये येण्याचे आव्हान देत राज ठाकरेंमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी बिहारमध्ये येऊन दाखवावं, धरून धरून मारू, असं चॅलेंजच दिल्याचे पाहायला मिळालंय.
निशिकांत दुबे म्हणाले, तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? टाटा, बिर्ला, रिलायन्सचे महाराष्ट्रात युनिट नाहीत. टाटांनी त्यांचा पहिला कारखाना बिहारमध्ये बांधला. तुम्ही आमच्या पैशावर जगत आहात, तुम्ही कोणता कर भरता? तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत, आमच्याकडे खाणी आहेत. झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशात आहेत, तुमच्याकडे कोणत्या खाणी आहेत? असा सवालच त्यांनी केलाय. जर तुमच्यात हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना, तेलगू-तमिळ भाषिकांनाही मारहाण करा, तरच आम्ही समजू की खरंच तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारस आहात आणि त्यांच्याच विचारांवर ते चालतात,असंही दुबे म्हणाले.

