Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळांचं शिवभोजन थाळीवर मोठं विधान
Minister Chhanag Bhujbal News : मंत्री छगन भुजबळ यांना आज अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. खात्याची जबाबदारी मिळताच त्यांनी याबद्दल प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं आहे. मंत्रिमंडळातून वगळल्याने भुजबळ अनेक दिवस नाराज होते, आपली नाराजी त्यांनी बोलूनही दाखवली होती. त्यानंतर आता मंत्रिपदाची शपथ घेताच भुजबळांना लागलीच अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देखील सोपवण्यात आलेली आहे. खात्याच्या जबाबदारीबाबत त्यांना फोन येताच भुजबळ लागलीच मुंबईला निघाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना यापूर्वी देखील आपण हे खातं बघितलेलं असून यावेळी तिसऱ्यांदा मी या खात्याचा मंत्री झालो असल्याचं म्हंटलं आहे.
यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, नऊ ते दहा वेळा मी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आणि सोडलाही आहे. अन्न आणि नागरी पुरवठा खातं हे माझ्याकडे तिसऱ्यांदा आलं आहे असं सांगत त्यांनी शिवभोजन थळीवर भाष्य केलं आहे. शिवभोजन थाळी योजना बंद करणार अशा चर्चा मी पण ऐकल्या होत्या. मात्र मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि सांगितलं की रोज दोन लाख लोकांना एक वेळचं जेवण मिळतं. रोज लोकांना थोडं तरी सहकार्य मिळालं पाहिजे अशी माझी भावना. रोज लोक पोट भरतात आणि सरकारचा प्रचार होतो. १४० ते १५० कोटी रुपये त्यासाठीचा खर्च आहे. ही योजना बंद करु नका हे मी सांगतिलं असल्याचं यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले.