ममता कुलकर्णीच नाही तर ‘हे’ सेलिब्रिटीसुद्धा स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले
अभिनेत्री ममता कुलकर्णीच नव्हे तर बॉलिवूडमधील इतरही काही सेलिब्रिटींनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. विनोद खन्ना, महेश भट्ट, बरखा मदन यांसारख्या सेलिब्रिटीसुद्धा अध्यात्माकडे वळले होते. त्यापैकी काहीजण पुन्हा संसारात परतले, तर काहींनी कायमचा संन्यास घेतला.
बॉलिवूड इंडस्ट्री किंवा ग्लॅमर विश्वात आल्यानंतर तिथल्या झगमगत्या दुनियेतून बाहेर पडणं सहज सोपं नसतं. स्टारडम, मेकअप, ग्लॅमर, प्रसिद्धी या सर्वांची मोहमाया सोडणं बरंच कठीण असतं. मात्र काही कलाकारांनी हे सर्व झुगारून अध्यात्मचा मार्ग स्वीकारला आहे. यातलं ताजं नाव म्हणजे ममता कुलकर्णी. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये पार पडलेल्या महाकुंभमध्ये तिला किन्नर अखाड्याचं महामंडलेश्वर बनवलं गेलं. यावरून नंतर वादसुद्धा निर्माण झाला. परंतु ममताच्या आधीही अनेक कलाकार अध्यात्माकडे झुकले होते. त्यात विनोद खन्ना, महेश भट्ट, अनु अग्रवाल, बरखा मदन, अनघा भोसले यांचाही समावेश आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेले अभिनेते विनोद खन्ना आणि निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट, विजय आनंद हे ओशो म्हणजेच आचार्य रजनीश यांच्या विचारांनी खूप प्रभावित झाले होते. अध्यात्मात काही काळ घालवल्यानंतर ठराविक कलाकार पुन्हा नेहमीच्या आयुष्यात परतले. मात्र असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी आपलं आयुष्य अध्यात्मासाठी समर्पित केलं.