आता धर्मदाय रुग्णालयांसाठी नवीन नियम! फडणवीसांनी दिली माहिती

| Updated on: Feb 24, 2026 | 12:13 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील धर्मदाय रुग्णालयांच्या नियमनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. मागील अधिवेशनात सवलतीची व्याख्या निश्चित करून ४७९ रुग्णालयांना कायद्याच्या कक्षेत आणले. रुग्णालयांमध्ये खाटांच्या उपलब्धतेसाठी डॅशबोर्ड प्रणाली सुरू केली असून, २% धर्मादाय निधीच्या पारदर्शक वापरासाठी नवीन सुधारणा आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रामध्ये ४७९ धर्मदाय रुग्णालये असून, त्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पूर्वी ‘सवलत’ या शब्दाची स्पष्ट व्याख्या नसल्यामुळे अनेक रुग्णालये कायद्याच्या कक्षेत येत नव्हती. मागील अधिवेशनात कायद्यात सुधारणा करून ‘सवलतीची’ नवीन व्याख्या तयार करण्यात आली. यामुळे आता ही रुग्णालये धर्मदायाच्या नियमांनुसार खाटा उपलब्ध करून देण्यास बांधील आहेत.

रुग्णालयांमध्ये खाटांच्या उपलब्धतेबाबत पारदर्शकता आणण्यासाठी आता एक डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. यामुळे कोणत्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती नागरिकांना मिळेल. तसेच, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रुग्णालयांना त्यांच्या एकूण निधीपैकी २% निधी धर्मदाय कामांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. या निधीचा गैरवापर टाळण्यासाठी आणि पारदर्शक वापर सुनिश्चित करण्यासाठी कायद्यात आणखी सुधारणा केली जाईल. वाढीव दरांसोबत, रुग्णालयांना प्रत्येक खाटेचा मूळ दर (बेस रेट) घोषित करणेही आता अनिवार्य असणार आहे.

Published on: Feb 24, 2026 12:13 PM