Kolhapur | कोल्हापुरातील उद्योजक संजय घोडावतांकडून 5 कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न
खंडणी न दिल्यास संजय घोडावत यांच्यासह कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी हातकणंगलेतून आरोपीला अटक केली आहे.
कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत (Sanjay Ghodawat) यांच्याकडून पाच कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. खंडणी न दिल्यास संजय घोडावत यांच्यासह कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी हातकणंगलेतून आरोपीला अटक केली आहे.
56 वर्षीय उद्योजक संजय घोडावत कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातील जयसिंगपूरमध्ये राहतात. 13 ते 18 जून या कालावधीत त्यांना व्हॉट्सअॅप मेसेज, एसएमएस आणि व्हॉट्सअॅप कॉल करुन आरोपींनी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. खंडणी न दिल्यास त्यांच्यासह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
संजय घोडावत यांच्यासह त्यांचे भागीदार निलेश बागी (रा. बेळगाव) यांनाही अशाच प्रकारची धमकी आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर घोडावत यांनी हातकणंगले पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.





