Ladki Bahin Yojana Video : लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी, ‘येत्या बुधवारपर्यंत…’
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. ७ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी ३००० रुपये जमा करण्यात येईल ! असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं होतं..
राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या बुधवारपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्याचे पैसे जमा होणार आहे. राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात मोठी माहिती दिली. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात येत्या १२ मार्चपर्यंत सलग दोन महिन्याचे म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा होणार आहे. दरम्यान, मार्च महिना सुरू झाला तरी अद्याप फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले नसल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात असल्याचे पाहायला मिळालं होतं. मात्र आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. महिला दिनाचे औचित्य साधत आम्ही फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता लाडक्या बहिणींना देत असून महिलांच्या खात्यात जमा पैसे होण्यास सुरुवात झाली असल्याचे गेल्या काही दिवसांपूर्वी आदिती तटकरे यांनी सांगितले होते.