
मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीत आहेत. अशात महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र लढणार असल्याची माहिती आहे. शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस 19 आणि काँग्रेस 8 जागा लढवणार असल्याची माहिती आहे. मित्रपक्षांना आपापल्या स्वतःच्या कोट्यातून जागा द्याव्यात, अशीही चर्चा झाली आहे. पाच ते सहा जागांवर एकमत न झाल्याने त्यावर पुन्हा चर्चा होणार आहे. मुंबईतील 4 जागा शिवसेना ठाकरे गट तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रत्येकी 1 जागा लढवणार आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात ठाकरे गट निवडणूक लढणार आहे. ईशान्य मुंबई ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि उत्तर मुंबईची जागा काँग्रेस लढणार आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत प्राथमिक बोलणी झाली आहेत. विधान परिषद आणि पोटनिवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत नेत्यांमध्ये एकत्र निवडणूक लढण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.