Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी बाबासाहेब शेख पाटील यांच्या कोर्टासमोर ही सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर महाड कोर्टाकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Aug 24, 2021 | 11:43 PM

महाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी बाबासाहेब शेख पाटील यांच्या कोर्टासमोर ही सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर महाड कोर्टाकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर बचाव पक्षाकडून राणे यांना जामीन देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांना जामीन मंजूर केलाय. (Mahad court grants bail to Narayan Rane)

कोर्टात नेमकं काय घडलं?

महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सुमारे एक तास सुनावणी पार पडली. जवळपास पाऊण तास दोन्ही बाजूचा युक्तिवाद चालला. त्यानंतर 15 मिनिटांनी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांचा जामीन मंजूर केला. नारायण राणे यांच्या एका विधानामुळे अनेक चुकीच्या घटना घडल्या आहेत. राणेंचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. महाड पोलिसांनी नरायण राणे यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांची ही मागणी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे नारायण राणे यांच्या वकिलांकडून राणे यांनी केलेलं विधान हे सार्वजनिक रित्या केलं होतं. त्यामुळे त्यामागे कुठलाही कट नव्हता असं म्हटलंय. तसंच राजकीय हेतूने प्रेरित होऊन पोलिसांनी राणेंवर कलमं लावल्याचा गंभीर आरोपही राणेंच्या वकिलांनी केला. तसंच राणेंच्या अटकेसाठी पोलिसांकडून कुठलंही अटक वॉरंट देण्यात आलं नाही, असा युक्तिवादही करण्यात आला. तसंच राणेंच्या प्रकृतीचं कारण देत राणेंना जामीन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

महाडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त

नारायण राणेंना अटक केल्यानंतर त्यांना दुपारी रत्नागिरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तिथून त्यांना महाड पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आलं. त्यानंतर राणेंना रात्री 8.35च्या सुमारास महाड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. राणे स्वत:च्या गाडीने आले होते. त्यांच्यासोबत नितेश राणे, प्रसाद लाड आणि प्रमोद जठारही होते. राणे पोहोचण्याची कुणकुण लागताच महाड पोलीस ठाण्याबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. यावेळी कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

(Mahad court grants bail to Narayan Rane)

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें