जितेंद्र आव्हाडांची हातात बेड्या घालून विधानभवनात एन्ट्री, नेमकं कारण काय? स्पष्टच म्हणाले….
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या हातात बेड्या घालून विधानभवन परिसरात एन्ट्री घेतल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजल्यानंतर आता आजपासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. यासोबत पीए आणि ओएसडीच्या मुद्दयांवर देखील विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान महिला सुरक्षेच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नेमकं काय घडतं? कोणते निर्णय घेतले जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या हातात बेड्या घालून विधानभवन परिसरात एन्ट्री घेतल्याचे पाहायला मिळाले. ‘नामदेव ढसाळ यांचा अपमान झाला म्हणून बेड्या हातात घातल्यात? महाराष्ट्रात, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. ते चिरडलं जात आहे. मुलभूत अधिकार शाबुत राहिले पाहिजेत’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. ट्रम्प सरकारने आखलेल्या धोरणामुळे अमेरिकेत असणाऱ्या भारतीयांवर जो अन्याय होतोय. त्यामुळे घर, संसार उद्ध्वस्त होतायत, भारतीयांना अपमानित करून त्यांना हिनवणारा प्रकार होतोय. यासाठी या बेड्या घातल्यात, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.