Nashik Unseasonal Rain : नाशिकमध्ये अवकाळीचा कहर; भाजीपाला सडला, शेतकरी हवालदिल
Nashik Crop Damage : राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना नुकसान झालं आहे. त्यामुळे भाजीपल्याचे दर वाढले आहेत.
राज्यात गेल्या 15 दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. उन्हाळ पिकांवर या पावसाचा परिणाम झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान, अवकाळी पावसाने भाजीपाल्याचं देखील नुकसान झालेलं आहे. अवकाळीच्या पाण्याने भाजीपाला अक्षरश: सडला आहे. हा सडलेला भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. पाले भाज्या देखील अती पाण्यामुळे सडायला लागल्याने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास अवकाळीने हिरावून घेतला आहे. परिणामी बाजारात भाज्यांची आवक मंदावल्याने बाजारात भाजीपाल्याच्या किमती वाढलेल्या बघायला मिळत आहे. फलबागांना देखील या पावसाने नुकसान झालेलं असल्याने द्राक्ष आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान झालेलं आहे. ऐन मोसमात आंब्यावर अवकाळीचा तडाखा बसल्याने आंबे खराब होण्यास सुरुवात झालेली आहे.