Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
संजय राऊत यांच्याकडून एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेवर होत असलेल्या टीकेला शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी कायंदे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांना थेट “बोगस” म्हटलं. संजय राऊत यांच्यासारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
संजय राऊत यांच्याकडून एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेवर होत असलेल्या टीकेला शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी कायंदे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांना थेट “बोगस” म्हटलं. संजय राऊत यांच्यासारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
“ज्याने निवडणुकीचा फॉर्म भरला नाही, साधी निवडणूक लढली नाही, तो शिंदेंनी पक्ष विकला असं कसं म्हणू शकतो?” असा सवाल मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांच्या मदतीमुळेच संजय राऊत राज्यसभेवर गेले आणि आमच्या मतांवर ते निवडून आले, असा दावाही त्यांनी केला.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावरूनही कायंदे यांनी राऊतांवर निशाणा साधला. “तुमच्या बाजूने निकाल लागला की आयोग चांगला आणि विरोधात निकाल लागला की आयोग वाईट,” अशी टीका त्यांनी केली. निवडणूक आयोगावर शिवीगाळ आणि शाप देण्याचं काम सुरू असल्याचं म्हणत त्यांनी या भूमिकेवरही आक्षेप घेतला.
शिवसेनेतील फूट आणि पक्षाच्या संघटनात्मक रचनेवर भाष्य करताना कायंदे यांनी लाखो कार्यकर्ते आणि नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्याचा दावा केला. बाहेरचा पक्ष वेगळा आणि आतला पक्ष वेगळा, अशा प्रकारचा युक्तिवाद केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं.
कपिल सिब्बल यांच्या सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादावरही मनीषा कायंदे यांनी टीका केली. सिब्बल यांना युक्तिवादासाठी मोबदला मिळतो आणि त्यामुळे ते भावनिक आरोप करत असल्याचं त्या म्हणाल्या. विधानसभा किंवा लोकसभेशी संबंधित काही विषयांवर निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित सभागृहांचा असल्याचं न्यायालयाने यापूर्वी स्पष्ट केल्याचा दाखलाही त्यांनी दिला.
“कोर्ट पुराव्यांवर चालतं. फक्त आरोप करून काही सिद्ध होत नाही,” असं म्हणत कायंदे यांनी ठाकरे गटाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देईल, हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र ठाकरे गटाकडून आधीच वातावरणनिर्मिती करून निर्णय जाहीर केल्यासारखं चित्र निर्माण केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीबाबत बोलताना ते आजारी असतील, त्यामुळे कदाचित आले नसतील, मात्र याबाबत आपल्याला फारशी माहिती नसल्याचं कायंदे यांनी स्पष्ट केलं. तसेच महामंडळ मिळावं आणि पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळावी, अशी आपली अपेक्षा असल्याचंही त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे गटावर टीका करताना कायंदे यांनी सुषमा अंधारे यांचाही उल्लेख केला. ठाकरे गटाकडे सध्या एकमेव विचारवंत म्हणून सुषमा अंधारे असल्याचं त्या म्हणाल्या. हिंदुत्वाच्या भूमिका मांडणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांच्या वडिलांबद्दल अपशब्द वापरणारे आणि इतरांवर टीका करणारे लोक कसे चालतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारक्षेत्राच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतल्याचा दावा सिब्बल यांनी केला आहे. त्यामुळे एकीकडे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी निर्णायक टप्प्यात असताना, दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे गटातील आरोप-प्रत्यारोपही अधिक तीव्र झाले आहेत.
Published on: Aug 14, 2026 10:51 AM
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ

