AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange on Eknath Shinde | डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग... एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगेंची तोफच धडाडली

Manoj Jarange on Eknath Shinde | डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग… एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगेंची तोफच धडाडली

| Updated on: Aug 06, 2026 | 1:18 PM
Share

पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी लोकप्रतिनिधींच्या वंशावळीचे आणि नोंदींचे दस्तऐवज सादर केले. सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे इतके पुरावे नसतील, तेवढे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा त्यांन केला.

मराठवाड्यातील नव्याने देण्यात आलेल्या काही कुणबी जात प्रमाणपत्रांच्या रद्दबातल कारवाईवरून मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली. काही लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे राजकीय दबावाखाली रद्द करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस विनाकारण मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. भाजपचा उमेदवार निवडून आला नाही म्हणून फोन करून कुणबी नोंदी रद्द करण्याचे आदेश दिले गेले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देत नोंदी रद्द करण्यासाठी दबाव टाकला.” तसेच, 15 लाख रुपयांच्या मोबदल्यासाठी प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याचा ऑफ-द-रेकॉर्ड दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.

पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी काही लोकप्रतिनिधींच्या वंशावळीचे आणि नोंदींचे दस्तऐवजही सादर केले. “सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे इतके पुरावे नसतील, तेवढे पुरावे माझ्याकडे आहेत,” असा दावा त्यांनी केला. संभाजीनगरच्या ज्योती सुधाकर शिंदे यांच्या वंशावळीचे दस्तऐवज दाखवत त्यांनी सरकारच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधताना जरांगे पाटील म्हणाले, “शिंदे साहेब, डबल गेम करू नका. मराठा समाजाच्या विरोधात आंदोलन करणारे लोक तुमच्या कार्यालयात कसे पोहोचतात? माझ्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काही समन्वयकांना तुमच्याकडूनच प्रोत्साहन दिले जात आहे.” त्यांनी संभाजीनगरातील बैठकींचाही उल्लेख करत सरकारवर मराठा आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

यावेळी जरांगे पाटील यांनी इशाराही दिला की, “सत्ता हातात आहे म्हणून खोटे प्रयोग करून मराठा समाजाचे नुकसान करू नका. गरज पडली तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी 15 ते 20 आमदार पाडू. मराठा समाजाने आता या अन्यायाविरोधात उठाव करण्याची वेळ आली आहे.” त्यांच्या या आक्रमक वक्तव्यांमुळे राज्यातील मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांचा वाद पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Published on: Aug 06, 2026 01:18 PM

Follow Us